Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

Sushma Swaraj : सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालं आहे. आज सायंकाळी त्यांच्या छातीत अचानकपणे दुखायला लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रात्री त्यांची प्राणज्योत मालावली.

Nupur Chilkulwar

|

Aug 07, 2019 | 1:49 AM

नवी  दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं निधन झालं. मंगळवारी संध्याकाळी अचानकपणे त्यांच्या (Sushma Swaraj) छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे पाच डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत होती. मात्र, रात्री 11 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली.

सुषमा स्वराज यांची प्रकृतीबाबत माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एम्समध्ये दाखल झाले होते. रुग्णालयात सुषमा स्वराज यांचे कुटुंबिय उपस्थित होते. सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी कळताच अर्थमंत्री पियुष गोयल, प्रल्हाद सिंग पटेल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही एम्स रुग्णालय गाठलं.

तीन तासांपूर्वीच सुषमा स्वराज यांनी जम्मू-काश्मीरवर मोदी सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं. त्यांनी ट्वीट करत सरकारचं अभिनंदन केलं. ”पंतप्रधान मोदीजी तुमचं खूप खूप अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हा दिवस पाहाण्याच्या प्रतिक्षेत होती”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

बुधवारी दुपारी तीन वाजता सुषमा स्वराज यांचे अंतिम संस्कार होणार

सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला एम्स रुण्गालयातून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आलं. बुधवारी (7 ऑगस्ट) सकाळी 8 ते 10.30 वाजेपर्यंत जंतंर-मंतर येथील निवासस्थानी त्यांचं पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर सकाळी 11 ते 2.30 वाजेपर्यंत भाजप कार्यालयात अंतिम दर्शनासाठी त्यांचं पार्थिव शरीर ठेवलं जाईल. तर दुपारी तीन वाजताच्या सुमारास लोधी रोड स्माशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.

राजकीय वर्तुळात शोककळा

सुषमा स्वराज यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षातील बडे नेते ते प्रत्येक कार्यकर्त्याला धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली. “माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील गौरवशाली अध्याय समाप्त झाला आहे. सुषमा स्वराज यांनी देशासाठी केलेल्या कामांसाठी नेहमीच स्मरणात राहतील.”

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. भारतीय राजकारणाच्या क्षितीजावरील चमकणारा सूर्य आज श्रीमती सुषमा स्वराज यांच्या रुपात मावळला आहे. त्या एक कुशल प्रशासक आणि संवेदनशील राजकारणी होत्या. त्या  एक उत्कृष्ट वक्त्याही होत्या. आज देशाने एक नमोल राजनेत्या गमावल्या आहेत, असं म्हणत ओम बिर्ला यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं, त्यानंतर काहीच वेळात नितीन गडकरी हे देखील रुग्णालयात दाखल झाले होते. “सुषमा स्वराज यांचे जाणे हे देशासाठी, पक्षासाठी आणि वैयक्तीकरित्या माझ्यासाठी नुकसानदायी आहे”, असं गडकरी म्हणाले.

“लोकसभेतून आल्यानंतर सुषमा स्वराज यांचं ट्वीट पाहिलं आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची वार्ता आली. माझ्याजवळ काही शब्दच उरलेले नाहीत”, असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही सुषमा यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं. सुषमाजींनी नेहमी आम्हाला प्रेरित केलं, असं जेपी नड्डा म्हणाले.

सुषमा स्वराज यांची संपूर्ण कारकीर्द (14 फेब्रुवारी 1952 ते 6 ऑगस्ट 2019)

2014 ते 2019 – परराष्ट्र मंत्री

मे 2014 ते जानेवारी 2016 – प्रवासी भारतीय कार्यमंत्री

2009 ते 2014 – लोकसभेच्या विरोधीपक्ष नेत्या

जानेवारी 2003 ते मे 2004 – संसदीय कामकाज मंत्री

जानेवारी 2003 ते मे 2004 – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 – माहिती व प्रसारण मंत्री

ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 – दिल्लीच्या मुख्यमंत्री

मे 2009 ते मे 2019 – खासदार (विदिशा लोकसभा मतदारसंघ)

मे 1996 ते ऑक्टोबर 1999 – खासदार (दक्षिण दिल्ली)

सुषमा स्वराज या 1977 ते 1982 या काळात हरियाणा विधानसभेत आमदार होत्या. वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी अंबाला कँटोनमेंट या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्या पुन्हा एकदा 1987 ते 1990 या काळात विधानसभेवर निवडून गेल्या.

1977 साली जुलैमध्ये देवी लाल यांच्या सरकारमध्ये सुषमा स्वराज यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. 1979 मध्ये त्यांच्यावर हरियाणाच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, जेव्हा त्यांचं वय केवळ 27 वर्षे होतं. हरियाणामध्ये त्यांनी शिक्षण मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं.

केंद्रात आल्यानंतर सुषमा स्वराज या त्यांच्या झटपट कामासाठी ओळखल्या जाऊ लागल्या. परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सभेतील भाषण असो, किंवा पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत सुरळीतता आणणं असो. सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत अनेकांना फक्त एका ट्वीटवर मदत केली आहे.

पाहा व्हिडीओ :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें