10 वर्षांपासून बंद होतं घर, मुलानं घरात घुसून बनवला Video, व्हिडीओ पाहाताच अख्खं गाव हादरलं, पोलिसांनाही फुटला घाम
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एक घर तब्बल दहा वर्ष बदं होतं, मात्र सोमवारी या परिसरात क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाचा बॉल या घरात गेला, आणि त्यानंतर दहा वर्षांपूर्वी घडलेली एक घटना समोर आली आहे.

हैदरबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एक घर तब्बल दहा वर्ष बदं होतं, मात्र सोमवारी या परिसरात क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाचा बॉल या घरात गेला. त्यानंतर आपला बॉल काढण्यासाठी या मुलानं घरात प्रवेश केला, घरात प्रवेश करताच या मुलानं तिथे अशा काही गोष्टी पाहिल्या ज्यामुळे दहा वर्षांपूर्वी घडलेली घटना समोर आली आहे, जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण?
ही घटना हैदराबादच्या नामपल्ली परिसरातील आहे, इथे एक मुलगा आपला बॉल शोधण्यासाठी बंद घरात घुसला होता, हे घर दहा वर्षांपासून बंद होतं, जेव्हा तो घरात घुसला तेव्हा त्याने पाहिलं की या घरात एक हाडाचा सापळा पोटावर जमिनीवर पडलेला आहे, त्यानंतर त्याने या घटनेचा व्हिडीओ बनवला, आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देखील मिळाली.
याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त किशन कुमार यांनी सांगितलं की, त्यांना त्या हाडाच्या सापळ्याजवळ एक जुना फोन सापडला आहे, तो फोन डिसर्चार्ज अवस्थेमध्ये होता, त्याची बॅटरी संपलेली होती, जेव्हा पोलिसांनी घटनेबाबत अधिक तपास केला तेव्हा त्यांना कळालं की हा मृतदेह अमिर खान नावाच्या एका व्यक्तीचा आहे. 2015 साली त्याच्या मोबाईवर एकाच मोबाईल नंबरवरून तब्बल 84 मिस्ड कॉल देण्यात आले होते.
एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार
ज्या व्यक्तीचा मृतदेह या बंद घरात आढळून आला, त्याचं वय अंदाजे 50 वर्ष असावं, तो मानसिकदृष्ट्या गतीमंद होता, त्याच्या वडिलांना एकूण दहा मुलं होते, म्हणजेच अमिर खान याला एकूण नऊ भाऊ होते, मात्र सर्वजण दुसरीकडे राहण्यासाठी गेले होते, या घरात तो एकटाच राहात होता, त्याचा मृत्यू झाला. परंतु दहा वर्षांपासून कोणीही त्याची चौकशी केली नसावी असं प्राप्त परिस्थितीवरून दिसून येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान पोलिसांना तिथे जीर्ण झालेल्या उशीखाली काही जुन्या नोटा देखील आढळून आल्या आहेत, या सर्व नोटा या नोटबंदीच्या आधीच्या काळातील म्हणजे 2016 पूर्वीच्या आहेत. मृतदेहाजवळ एक अंगठी देखील पोलिसांना सापडली आहे.
