काश्मीरमध्ये TRF ने 25 दहशतवादी हल्ले केले, पण पहलगाम हल्ल्याबाबत कोणालाही कल्पना का नव्हती? प्रियांका गांधींचा सरकारला सवाल
लोकसभेत आजही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. त्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेत आजही ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. लष्कराने ऑपरेशन महादेवमध्ये पहलगाममधील दहशतवाद्यांना ठार मारले आहे असं अमित शाह यांनी संसदेत सांगितलं. त्यानंतर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सैन्याच्या शौर्याला सलाम केला. त्या म्हणाल्या की, 1948 मध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पहिल्या घुसखोरीपासून देशाची अखंडता कायम ठेवण्यात सैन्याने महत्वाची भूमिका बजावली आहे. काल आणि आज मत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. मात्र एकाही मंत्र्याने पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला कसा झाला, तो का झाला? हे सांगितले नाही.
प्रियांका गांधी यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला पर्यटनाला गेले होते, मात्र सरकारने त्यांना देवाच्या भरोशावर सोडले. या हल्ल्याला कोण जबाबदार आहे? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी संरक्षणमंत्र्यांची नाही का? गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल गांधी यांनी विचारला आहे. काश्मीरमध्ये TRF ने 25 दहशतवादी हल्ले केले, पण पहलगाम हल्ल्याबाबत कोणालाही कल्पना का नव्हती? या हल्ल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली नाही हे मोठे अपयश आहे असंही गांधी यांनी म्हटलं.
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, पहलगाम हल्ल्यानंतर लष्करप्रमुखांनी, गुप्तचर प्रमुखांनी राजीनामा दिला का? गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का? राजीनामा तर सोडाच, त्यांनी साधी जबाबदारीही घेतली नाही. तुम्ही 11 वर्षे सत्तेत आहात. उरी-पुलवामाच्या वेळी राजनाथ जी गृहमंत्री होते, आज ते संरक्षणमंत्री आहेत. अमित शहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्ली दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत. का? सरकार नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत नाही असं गांधी यांनी म्हटलं आहे.
जेव्हा पहलगामवर हल्ला झाला तेव्हा संपूर्ण देश एकत्र झाला होता. असं पुन्हा घडलं तर आपण पुन्हा एकत्र उभे राहू. जर देशावर हल्ला झाला तर आम्ही सर्वजण सरकारसोबत उभे राहू. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याने शत्रूंना धडा शिकवला. मात्र पंतप्रधानांना त्याचे श्रेय हवे आहे असा आरोपही प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांवर केला आहे.
