US Tariff: अमेरिकेचा गेम निश्चित! भारत ‘या’ देशाच्या मदतीने टाकणार मोठा डाव
भारत पुढील आठवड्यात ब्राझीलसोबत व्हर्च्युअल बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुक्त व्यापार करार (FTA) वर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह इतरही अनेक देशांवर कर लादलेला आहे. यात ब्राझीलचाही समोवेश आहे. अशातच आता भारत आणि ब्राझील हे दोन देश आता एकत्र येणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत पुढील आठवड्यात ब्राझीलसोबत व्हर्च्युअल बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुक्त व्यापार करार (FTA) वर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारताचा 2004 पासून मर्कोसुरसोबत (दक्षिण अमेरिकेतील देशांची व्यापार संघटना ) प्राधान्य व्यापार करार (PTA) आहे. अर्जेंटिना, उरुग्वे आणि पॅराग्वे हे देशही या संघटनेचे सदस्य आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, विकसित देशांमध्ये सध्या मंदी पहायला मिळत आहे, याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. यासोबत अमेरिकेने अलीकडेच लादलेल्या करांचा फटका कमी करण्यासाठी भारत नवीन बाजारपेठ शोधत आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझील, अर्जेंटिना आणि पॅराग्वेच्या राष्ट्रपतींची भेट घेतली होती. तसेच ब्राझीलचे उपराष्ट्रपती देखील पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आता भारत लवकरच मर्कोसुरसोबत एक मुक्त व्यापार करार करण्याची शक्यता आहे. याचा अमेरिकेला फटका बसेल. कारण भारत आता अधिकच्या करासह अमेरिकेला वस्तूंची निर्यात करत आहे, मात्र भारताला बाजारपेढ मिळाल्यानंतर अमेरिकेला जाणारा माल दुसऱ्या देशात पाठवला जाईल, त्यामुळे अमेरिकेला फटका बसेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बरेच लॅटिन अमेरिकन देश व्यापार करण्यासाठी नवीन देश शोधत आहेत. या देशांची नजर भारतावर आहे. कारण या देशातील उत्पादन हे मर्यादित आहे, ज्यामुळे अशा देशांकडून वस्तू आयात केल्या तरी त्याला फटका भारताच्या देशांतर्गत उद्योगांना बसत नाही. त्यामुळे आता पीटीए अंतर्गत असणारा व्यापार वाढवला जाण्याची शक्यता आहे. याबाबत नवा करारही होण्याची शक्यता आहे.
2.94 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था
मर्कोसुर देशांचा दक्षिण अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेत 67 % पेक्षा जास्त वाटा आहे. आकडेवारीनुसार, दक्षिण अमेरिकन देशांची एकूण अर्थव्यवस्था4.38 ट्रिलियन डॉलर्स आहे, यातील मर्कोसुर सदस्य देशांची अर्थव्यवस्था 2.94 ट्रिलियन डॉलर्सची आहे. आगामी काळात मर्कोसुर ब्लॉकमध्ये पीटीएचे एफटीएमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. या मुक्त व्यापार करारामुळे भारतीय निर्यातदारांना मर्कोसुर देशांच्या मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळेल. तसेच भारताला कॅरिबियन आणि पॅसिफिक प्रदेशातील नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळेल. याचा भारतालाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
