चीनचा पाकिस्तानला मोठा दणका, भारताचं तोंडभरून केलं कौतुक, नव्या भूमिकेमुळे पाकची झोप उडाली

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची स्थिती आहे, अमेरिकेनं आधीच भारताला पाठिंबा दिला आहे, आता चीनच्या नव्या भूमिकेमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे.

चीनचा पाकिस्तानला मोठा दणका, भारताचं तोंडभरून केलं कौतुक, नव्या भूमिकेमुळे पाकची झोप उडाली
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: May 09, 2025 | 2:56 PM

भारतानं पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला आहे, पाकिस्तानमध्ये घूसुन दहशतवाद्यांचे आड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. मात्र त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव चांगलाच वाढला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानवर पुन्हा एकदा ड्रोन हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली, त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला, या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला आहे, या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढतच आहे, कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकतं अशी परिस्थिती आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता चीननं दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलं आहे. अशी कोणतीही कारवाई करू नका, ज्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होईल, शातंता आणि संयम ठेवा, यातच सर्वांचं हीत आहे, असं चीननं म्हटलं आहे. आम्ही दोन्ही देशांसोबत मिळून शांततेसाठी कार्य करत आहोत असंही चीननं म्हटलं आहे. दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करावं असंही चीननं म्हटलं आहे.

मात्र याचदरम्यान चीनच्या भारतामधील राजदुतानं केलेल्या एका ट्विटमुळे पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. चीनचे राजदूत फेइहोंग ने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, चीन अद्ययावत दूरसंचार प्रणाली आणि ईव्हीमध्ये पुढे आहे तर भारतानं आयटी आणि इनोव्हेशन क्षेत्रामध्ये मोठी मजल मारली आहे, भारत चमकत आहे, भारत आणि चीन दोन्ही देश मिळून तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जगाला पुढे नेत आहेत. या दोन्ही देशांचं जागतिक प्रगतीमध्ये मोठं योगदान आहे. चीनकडून करण्यात आलेले हे ट्विट भारत -पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडून काल भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, जम्मू काश्मीरचं विमानतळ आणि विद्यापीठ पाकिस्तानच्या टार्गेटवर होतं, मात्र भारतानं पाकिस्तानच्या हल्ल्याचा हा कट उधळून लावला आहे.