या मोठ्या देशामधून भारतीय नागरिकांना बळजबरीने बाहेर काढलं जातं आहे, नेमकं कारण काय?
कॅनडामधून भारतीय नागरिकांना बळजबरीने बाहेर काढण्यात येत आहे, गेल्या सहा वर्षांपासून हा आकडा वाढतच असून, 2024 मध्ये तर या आकडेवारीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये, म्हणून अमेरिकेकडून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, एकीकडे अमेरिकेकडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे, एवढंच नाही तर अमेरिकेत नोकरीसाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या कमी व्हावी, यासाठी अमेरिकेनं H1B व्हिसाच्या शुल्कामध्ये देखील मोठी वाढ केली आहे, याचा सर्वात मोठा फटका हा भारताला बसला आहे, सोबतच अमेरिकन सरकारने तेथील शाळा, महाविद्यालयांचे नियम देखील बदलल्यानं भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेनंतर आता कॅनडामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.
कॅनडामधून भारतीय नागरिकांना बळजबरीनं बाहेर काढलं जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून सातत्यानं या आकड्यामध्ये वाढच होत आहे. 2019 मध्ये कॅनडामधून बळजबरी बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची संख्या 625 इतकी होती, तर 2024 मध्ये हा आकडा 1891 वर पोहोचला आहे. याचाच अर्थ एकाच वर्षामध्ये 1891 भारतीय नागरिक बळजबरीने कॅनडामधून बाहेर काढण्यात आले आहेत. कॅनडाच्या बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीकडून यासंदर्भातील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, कॅनडामधून सध्या ज्या नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे, त्यामध्ये मॅक्सिको प्रथम क्रमांकावर आहे, 2024 मध्ये तब्बल 3683 मॅक्सिकोच्या नागरिकांना कॅनडाने आपल्या देशाबाहेर काढलं होतं. तर दुसरा नंबर हा भारताचा आहे, कॅनडामधून 2024 मध्ये तब्बल 1891 नागरिकांना बळजबरी बाहेर काढण्यात आलं आहे. तर या यादीमध्ये तिसरा नंबर हा कोलंबियाचा आहे, आतापर्यंत कॅनडामधून 981 कोलंबियाच्या नागरिकांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
नेमकं कारण काय?
याबाबत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच टोरंटोमध्ये बोलताना म्हटलं होतं की, सध्या आम्ही आमच्या इमिग्रेशन सिस्टीममध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणत आहोत, याच पार्श्वभूमीवर ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे, किंवा जे एखाद्या गुन्ह्याशी संबंधित आहेत, अशा लोकांना आम्ही डिपोर्ट करत आहोत. आतापर्यंत मॅक्सिको, भारत आणि कोलंबिया या तीन देशातील सर्वाधिक नागरिकांना कॅनडानं देशाबाहेर काढलं आहे.
