कर्नाटकात उलथापालथ निश्चित, काँग्रेस-जेडीएसचे 10 आमदार राजीनामा देऊन मुंबईत

राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे 10 आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचं सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:31 PM, 6 Jul 2019
कर्नाटकात उलथापालथ निश्चित, काँग्रेस-जेडीएसचे 10 आमदार राजीनामा देऊन मुंबईत

बंगळुरु : कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 14 आमदारांच्या राजीनाम्यानंतर सत्तापालट होणार हे जवळपास निश्चित झालंय. भाजपकडून ‘ऑपरेशन कमळ’ वारंवार सुरु करण्यात आलं होतं आणि आता विरोधकांच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून आमदारांची खेरदी होत असल्याचा आरोप होतोय. विशेष म्हणजे राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे 10 आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचं सरकार पाडण्याच्या हालचालींना वेग आलाय.

राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे 8, तर जेडीएसचे 3 आमदार आहेत. याअगोदरही 3 आमदारांनी राजीनामा दिला होता. 11 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन राजीनामे सादर केले. यावेळी अध्यक्ष हजर नसल्याने सचिवांकडे राजीनामे देण्यात आले. विशेष म्हणजे राजीनामे देण्यासाठी गेलेल्या आमदारांनी आपले मोबाईलही बंद केले होते. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना आपल्या आमदारांशी संपर्क साधणं अशक्य झालं.

कर्नाटक विधानसभेचं पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 224 सदस्य आहेत. बहुमतासाठी 113 सदस्यांची आवश्यकता असते. काँग्रेस-जेडीएसकडे सध्या (राजीनामा दिलेल्या आमदारांसह) 118 आमदार आहेत. यामध्ये काँग्रेस 78, जेडीएस 37, बसपा 01 आणि 2 अपक्षांचा समावेश आहे. तर सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडे 105 सदस्य आहेत. 14 बंडखोर आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यास विधानसभेचं संख्याबळ 210 होईल. या परिस्थितीमध्ये बहुमतासाठी 113 ऐवजी 106 सदस्यांची गरज असेल. राजीनामे स्वीकारल्यानंतर काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ 104 होईल, जे बहुमतापेक्षा कमी आहे.

आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारी निर्णय होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामे मंजूर केल्यास कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल आणि भाजपसाठी संधी निर्माण होईल. या परिस्थितीमध्ये बहुमतासाठी 106 जागांची आवश्यकता असेल. भाजपला केवळ एका आमदाराची गरज असेल, जी अपक्षांकडून केली जाऊ शकते.

“भाजप सत्तास्थापनेसाठी तयार”

विशेष म्हणजे याआधीही भाजपने कर्नाटकात ऑपरेशन लोटस राबवलं होतं. मात्र यावेळी भाजपला यश आल्याचं दिसतंय. त्यामुळे सत्ता स्थापनेस तयार असल्याचं कर्नाटकचे नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडांनी म्हटलंय. 2018 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष बनूनही सत्ता स्थापन करता आली नाही. जेडीएस आणि काँग्रेसने हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली खरी, मात्र मंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये नाराजी होती आणि याचाच फायदा भाजप घेताना दिसत आहे.