संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला जाताना भीषण अपघात, दहा महिलांचा मृत्यू

कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. (Karnataka Dharwad Accident kills 10 women)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:20 AM, 15 Jan 2021
संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला जाताना भीषण अपघात, दहा महिलांचा मृत्यू

बंगळुरु : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला टिपरने धडक दिल्यामुळे धारवाडमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी 17 महिला गोव्याला निघाल्या असताना काळाने घाला घातला. (Karnataka Dharwad Tempo Traveller Accident kills 10 women)

कर्नाटकमध्ये धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण अपघात झाला. पहाटे 3 वाजताच्या सुमारास टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. या अपघातात 10 महिलांचा जागीच मृत्यू झाला. प्रवासात झोपलेल्या असतानाच महिलांवर संक्रांत कोसळली.

महिला क्लबच्या सदस्या गोवा दौऱ्यावर

एकूण 17 महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. देवनगरेतील महिलांच्या क्लबच्या त्या सदस्या होत्या. गोव्याला पोहोचण्यापूर्वी धारवाडजवळच भीषण अपघातात दहा जणींना प्राण गमवावे लागले. धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अडकलेले दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

पाच महिलांची प्रकृती चिंताजनक

अपघातात पाच महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघी जणींना किरकोळ दुखापत झाली आहे.

संबंधित बातम्या :

मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, मर्सिडीज दुभाजकावर आदळून मुंबईत भीषण अपघात

VIDEO | कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, पुण्यात गरवारे पुलावरुन कार खाली कोसळली

(Karnataka Dharwad Tempo Traveller Accident kills 10 women)