Explained: कोरोना निदानात पल्स ऑक्‍सिमीटरचं महत्त्व वाढलं, काय उपयोग, कसं वापरावं, किंमत किती?

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Apr 17, 2021 | 4:47 PM

प्रकृती बिघडण्याआधीच घरच्या घरी कोरोना संसर्गाचा अंदाज येण्यासाठी दिल्लीतील ऑक्सिमीटर पॅटर्न समजून घेणं महत्त्वाचं आहे.

Explained: कोरोना निदानात पल्स ऑक्‍सिमीटरचं महत्त्व वाढलं, काय उपयोग, कसं वापरावं, किंमत किती?

What is Pulse Oximeter and how it works for Covid Patient: देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यातच वाढत्या रुग्ण संख्येने महाराष्ट्रात रुग्णालयातील बेड्सची कमतरता जाणवते आहे. इतकंच नाही तर अगदी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्सचीही उणीव जाणवत आहे. कोरोनाचं उशीराने निदान झाल्यानंतर संबंधित रुग्णाची प्रकृती बिघडते आणि अशा रुग्णांच्या मृत्यूचंही प्रमाण वाढतं. म्हणूनच हे टाळण्यासाठी देशाची राजधानी दिल्लीत केजरीवाल सरकारने वापरलेला “ऑक्सिमीटर पॅटर्न” देशभरात चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील अनेक तज्ज्ञांनी कोरोना नियंत्रणात आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात ऑक्सिमीटरचं महत्त्व नोंदवलंय. तसेच दिल्ली सरकारच्या या प्रयत्नांचं कौतुक केलंय. चला तर पाहुयात काय आहे हा ऑक्सिमीटर पॅटर्न आणि तुमच्या आमच्यासाठी हे समजून घेणं का महत्त्वाचं आहे (Know all about use of Pulse Oximeter in diagnosing Covid Patient corona).

पल्मोनरी डिजीज एक्सपर्ट डॉक्टरांच्या मते कोरोना संसर्ग होणाऱ्या प्रत्येक रुग्णाने रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता नाही. केवळ ज्या रुग्णांची रक्तातील ऑक्सिजनची पातळी विशिष्ट प्रमाणाच्या खाली जाते त्यांनाच रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचाराची गरज आहे. इतर रुग्ण घरच्या घरी विलगीकरणात राहून नियमितपणे ऑक्सिजनची पातळी तपासत उपचार घेऊन बरे होऊ शकतात.

तुमची ऑक्‍सिजन पातळी योग्य आहे का हे कसं तपासाल?

तुमच्या रक्तात ऑक्सिजनची पातळी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी ऑक्‍सिमीटर (Oximeter) म्हणजेच पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximeter) महत्त्वाचं आहे. मागील वर्षी दिल्लीत याच यंत्राच्या सहाय्याने कोरोना नियंत्रण करण्यात केजरीवाल सरकारला यश आलं होतं. दिल्ली सरकारने घरी विलगीकरण केलेल्या रुग्णांना हे Pulse Oximeter उपलब्ध करुन दिलं होतं. यामुळे अनेक रुग्णांना घरच्या घरी आपल्या ऑक्सिजनची पातळी नियमितपणे तपासता आली. ज्यांची ऑक्सिजन पातळी चांगली होती ते घरची थांबून बरे झाले आणि ज्यांच्या ऑक्सिजन पातळीत घट झाली त्यांना रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले.

कोरोना काळात प्रत्येक घरात विशेषतः जेथे वयोवृद्ध आहेत त्यांची ऑक्सिजन पातळी सातत्याने तपासत राहणं महत्त्वाचं ठरत आहे. म्हणूनच तुमच्या घरातही ऑक्सिमीटरची गरज आहे का हे तपासण्याची गरज आहे.

ऑक्सिमीटर काय आहे?

पल्स ऑक्सीमीटर डिजीटल यंत्र असून ते आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासतं. त्याला पीपीओ म्हणजेच पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर देखील म्हणतात. क्लिपसारखं काम करणारं हे यंत्र मागच्या बाजूने दाबलं की त्यात आपल्या हाताचं बोट ठेऊन ऑक्सिजन पातळी तपासता येते. आपलं बोट ऑक्सिमीटरमध्ये ठेवण्याआधी मशीन सुरु करावं. मशीन सुरु केल्यानंतर त्यात लाल लाईट लागेल. त्यानंतर मशीन रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासून त्याचं प्रमाण स्क्रीनवर दाखवतं. यामुळे नियमितपणे काही तासांनी ऑक्सिजनची पातळी तपासता येते.

हे मशीन कसं काम करतं?

पल्स ऑक्सिमीटर ऑन केल्यानंतर जेथे बोट ठेवलं जातं तेथे एक लाईट लागते. ती लाईट बोटाच्या त्वचेवर पडते आणि मशीन रक्तातील पेशींचा रंग आणि हालचालींचं निरिक्षण करतं. ज्या रक्त पेशींमध्ये ऑक्सिजन पातळी व्यवस्थित असते त्या लाल रंगात चमकतात आणि ज्या पेशींमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी आहे त्या लाल गडद दिसतात.

ऑक्सिमीटर शरीरातील किती टक्के रक्तपेशींमध्ये ऑक्सिजनची पातळी चांगली आहे त्याचं प्रमाण दाखवतं. म्हणजेच 96 रिडिंग दिसल्यास त्याचा अर्थ तुमच्या रक्तातील 96 टक्के रक्तपेशींमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण योग्य आहे आणि 4 टक्के रक्तपेशींमधील रक्ताची पातळी बिघडली आहे. विशेष म्हणजे या मशीनमुळे रक्त घेण्याची गरज नाही.

निरोगी व्यक्तीची ऑक्‍सिजन पातळी किती असते?

डॉ हेंसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, निरोगी सामान्य व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सीजनची पातळी 95 ते 100 टक्के असते. मात्र, ही पातळी 95 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास फुफुसाची ऑक्सिजन पुरवण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचा इशारा आहे. कोरोना आणि ऑक्सिजन पातळी असा विचार केल्यास ज्या व्यक्तींची ऑक्सिजन पातळी 92 टक्क्यांपेक्षा खाली गेलीय त्यांची स्थिती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करुन ऑक्सिजन देण्याची आवश्यकता पडू शकते. असं असलं तरी हे सामान्य व्यक्तीला लागू आहे. जर एखादी व्यक्ती मागील मोठ्या काळापासून इतर आजारांचा सामना करत असेल तर त्याबाबत हे आकडे वेगळे असतात. त्यासाठी डॉक्टरांचाच सल्ला अत्यावश्यक आहे.

ऑक्सिजन तपासताना काय काळजी घ्यावी?

महत्त्वाचं म्हणजे ज्या बोटाला हे मशीन लावून ऑक्सिजन मोजला जाणार आहे त्या बोटाचं नख वाढलेलं नसावं किंवा नखाला नेल पॉलिश केलेली नसावी. हात थंड झालेले नसावेत. ती व्यक्ती धावून किंवा पळून आलेली नसावी. सामान्य स्थितीतील रक्तदाब असतानाच ऑक्सिजन मोजावा.

दिल्ली सरकारचं मॉडेल काय होतं?

दिल्लीत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना सुरुवातीला रुग्णालयात दाखल करुन त्यांची तपासणी केली जात. ज्या रुग्णांना इतर व्याधी नाहीत आणि ऑक्सिजनची पातळी चांगली आहे त्यांना गृहविलगीकरणात (Home Isolation) पाठवलं जात. घरी पाठवताना या रुग्णांना दिल्ली सरकारकडून पीपीओ म्हणजेच पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध करुन देण्यात येत. त्यामुळे हे रुग्ण घरच्या घरी आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासू शकायचे. ज्यांना ऑक्सिजन कमी झाला असतं लक्षात आलं त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत आणि ज्यांची ऑक्सिजन पातळी व्यवस्थित राहत ते घरीच उपचार घेऊन बरे होत. बरे झाल्यानंतर हे ऑक्सिमीटर पुन्हा परत घेतलं जात.

ऑक्सिमीटर कोरोनाची तपासणी करत नाही, तर केवळ लक्षणांवरुन अंदाज लावते

ऑक्सिमीटर कोरोनाची अचूक चाचणी करत नाही. तर केवळ शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवरुन त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे की नाही याचा अंदाज देतं. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास त्या व्यक्तीला कोरोनाच झालेला असेल असं नाही. ऑक्सिजन कमी होण्याची इतरही काही कारणं असू शकतात. त्यामुळे ऑक्सिमीटरला कोरोनाच चाचणी करण्याला पर्याय समजू नये.

कोठे खरेदी कराल, किती किंमत?

आतापर्यंत तुम्ही ऑक्सिमीटरचं महत्त्व समजून घेतलं. आता जर तुम्हाला हे तुमच्या घरात ठेवायचं असेल तर ते कुठे मिळतं आणि किती रुपयांना मिळतं असा प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. याची किंमत 400 रुपयांपासून अगदी 4000 रुपयांपर्यंत आहे. तुम्हाला ते औषध दुकान म्हणजेच मेडिकल शॉपमध्ये सहज मिळू शकतं. तुम्ही हे अमेझॉन आणि फ्लिपकार्डवर ऑनलाईनही खरेदी करु शकता.

हेही वाचा :

Special Story | ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर मशीनसह इतर उपकरणांचा उपयोग फायदेशीर की नुकसानकारक?

व्हिडीओ पाहा :

Know all about use of Pulse Oximeter in diagnosing Covid Patient corona

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI