कोलकाता प्रकरणात आरोपीची सायकोलॉजिकल टेस्ट का? कशी असते ही चाचणी? विकृत मानसिकतेमागचं कारण येणार समोर?

कोलकाता प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या सायकोलॉजिकल टेस्टमधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर केलेल्या क्रूरतेचं वर्णन करताना त्याला कोणताही पश्चात्ताप वाटला नसल्याचं निदर्शनास आलं. इतकंच नव्हे तर उत्तरं देताना तो अनेकदा हसतही होता.

कोलकाता प्रकरणात आरोपीची सायकोलॉजिकल टेस्ट का? कशी असते ही चाचणी? विकृत मानसिकतेमागचं कारण येणार समोर?
कोलकाता प्रकरणातील आरोपीImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 12:35 PM

कोलकातामधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातील (Kolkata Doctor Case) आरोपीची सीबीआयकडून सायकोलॉजिकल टेस्ट केली जातेय. सीबीआयसारख्या एजन्सीकडून फार क्वचित सायकोलॉजिकल टेस्टचा आधार घेतला जातो. ही टेस्ट करण्यामागचा उद्देश केवळ आरोपीची मानसिक स्थिती जाणून घेणं नसून तो कोणत्या कारणामुळे इतका विकृतपणे वागला, कोणत्या गोष्टींनी त्याला प्रवृत्त केलं, यादेखील प्रश्नांची उत्तरं मिळवणं आहे. 9 ऑगस्ट रोजी कोलकातामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे.

सायकोलॉजिकल टेस्ट कशासाठी?

सीबीआयकडून केल्या जाणाऱ्या या सायकोलॉजिकल टेस्टमध्ये (Psychological test) आरोपीच्या चारित्र्याचं मूल्यमापन केलं जातंय. नंतर ही माहिती न्यायालयात सादर केली जाऊ शकते. या टेस्टमुळे गुन्हेगारांची मानसिकता समजण्यास मदत होते आणि परिणामी भविष्यात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे रोखण्यास मदत होऊ शकते. कोलकाता प्रकरणातील पीडित डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. या तरुणीच्या शरीरावर 16 बाह्य आणि नऊ अंतर्गत जखमा आढळून आल्या होत्या. तिचा मृत्यू हाताने गळा दाबल्यामुळे झाला आहे, अशी माहिती शवविच्छेदन अहवालात आहे. पीडितेचे गाल, ओठ, नाक, मान, हात आणि गुडघ्यावरील ओरखडे तसंच खासगी अवयवांना जखमा झालेल्या होत्या. मान, टाळू आणि इतर भागांच्या स्नायूंमध्ये नऊ अंतर्गत जखमा झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. या सर्व जखमा मृत्यूपूर्वीच्या आहेत, असंही नमूद केलं आहे.

आरोपी संजय रॉयच्या या हिंसक वर्तनामागील मूळ कारण काय, हे समजून घेण्यासाठी सीबीआय त्याची सायकोलॉजिकल टेस्ट करत आहे. आरोपीने हे कृत्य स्वत: रचलं होतं का किंवा त्यात त्याला सहकारी, इतर आरोपींचा पाठिंबा होता का हेदेखील टेस्टद्वारे उघड होईल, असं सीबीआयच्या सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलंय. दिल्लीच्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (CFSL) मानसशास्त्रीय आणि वर्तणुकीशी संबंधित तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील टीमकडून आरोपीची सायकोलॉजिकल टेस्ट केली जातेय. काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये पोहोचलेल्या सीएफएसएलच्या टीमने सर्वांत आधी गुन्ह्याच्या ठिकाणाहून पुरावे गोळा केले. “सीएफएसएल आणि एम्स दिल्लीचं संयुक्त पथक घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत. केसच्या बॅकअपसाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत”, असंदेखील सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलंय.

हे सुद्धा वाचा

कोलकाता प्रकरणात सायकोलॉजिकल टेस्टचा वापर का?

कोलकाता प्रकरणात सायकोलॉजिकल टेस्टचा विचार का केला असा प्रश्न विचारला असता एका माजी सीबीआय अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं, “जेव्हा आरोपी किंवा साक्षीदार हे घटनेविषयी संपूर्ण माहिती देत नाहीत तेव्हा हे तंत्र वापरलं जातं. आरोपीच्या कबुलीजबाब किंवा कथनात काही गोष्टी लपवल्या गेल्या आहेत असा जेव्हा तपास अधिकाऱ्यांना संशय येतो, तेव्हा सायकोलॉजिकल टेस्टचा आधार घेतला जातो. याद्वारे त्याची मानसिक स्थिती समजली जाऊ शकते. एखाद्या प्रकरणात जर आरोपी चौकशीत सहकार्य करत नसेल, तेव्हासुद्धा सायकोलॉजिकल टेस्ट केली जाते.”

टेस्ट कशी केली जाते?

या टेस्टमध्ये तपास अधिकाऱ्यांव्यतिरिक्त फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांचाही समावेश असतो. आरोपींना तेसुद्धा प्रश्न विचारतात आणि त्याच्या प्रतिसादाचं मूल्यांकन करतात. “काही प्रकरणांमध्ये ठराविक प्रश्न विचारल्यावर आरोपी त्यावर भावनिक प्रतिसाद देऊ शकतो. यावरून त्याच्या चारित्र्याला समजून घेण्यास मदत होते. जर बहुतांश प्रश्नांना आरोपीने नीट उत्तरं दिली नाही किंवा मौन बाळगणं पसंत केलं तर त्याला घटनेविषयी सहानुभूती नाही असं ठरवलं जाऊ शकतं”, असंदेखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

संजय रॉयच्या सायकोलॉजिकल टेस्टमधून धक्कादायक माहिती उघड

कोलकाता डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणातील आरोपी संजय रॉयची सायकोलॉजिकल टेस्ट करणाऱ्या डॉक्टरांना त्याचं मूल्यांकन पाहून धक्का बसला आहे. संजय रॉय हा लैंगिक विकृत मानसिकतेचा व्यक्ती असल्याचं या चाचणीतून समोर आल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी ‘एबीपी लाइव्ह’ला दिली आहे. त्याला पॉर्नचं व्यसन होतं आणि त्याच्या मोबाइल फोनमध्ये अनेक अश्लील व्हिडीओ आढळल्याचं कोलकाता पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं होतं. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोवैज्ञानिक चाचणी करणाऱ्या पाच डॉक्टरांच्या प्रश्नांची उत्तरं देताना संजयने 9 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. पीडितेवर केलेल्या क्रूरतेचं वर्णन करताना त्याला कोणताही पश्चात्ताप वाटला नसल्याचं निदर्शनास आलं. इतकंच नव्हे तर डॉक्टरांच्या प्रश्नांची उत्तरं देताना तो अनेकदा हसतही होता. या टेस्टदरम्यान सीबीआयने संजय रॉयला त्याच्या खासगी आयुष्याबाबत महत्त्वाचे प्रश्न विचारले. एकापेक्षा अधिक लग्न, त्याच्या मोबाइलमध्ये सापडलेले हिंसक आणि अश्लील व्हिडीओ यांसंबंधीचे प्रश्न त्याला विचारले गेले.

टेस्टदरम्यान संजयने असाही खुलासा केला होता की तो अनेकदा रेड लाइट एरियामध्ये जात असे. मात्र 9 ऑगस्ट रोजी तो रेड लाइट एरियामध्ये गेला होता का, याबद्दल त्याने स्पष्ट उत्तर दिलं नाही. सीबीआयच्या सूत्रांनी ‘एबीपी लाइव्ह’ला दिलेल्या माहितीनुसार, संजय रॉयने घटनेच्या दिवशी पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचंही मान्य केलं. त्याचप्रमाणे त्याने त्याच्या क्रूरतेबद्दलचे तपशीलही स्पष्टपणे सांगितले.

आरोपीला सॅटीरियासिस हा विकार?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आरोपी संजय रॉय हा सॅटीरियासिस (Satyriasis) या विकाराने ग्रस्त असू शकतो. सॅटीरियासिस ही पुरुषांमधील हायपरसेक्शुॲलिटीची मानसिक स्थिती असते. अतिलैंगिकता किंवा हायपरसेक्शुॲलिटी हा एक मानसिक विकार आहे, ज्यामुळे पुरुषांमधील लैंगिक इच्छा अति प्रमाणात किंवा अनियंत्रित होऊ शकते. या विकाराने ग्रस्त असलेले पुरुष हे सतत लैंगिक क्रियाकलापांमध्ये व्यस्त असतात किंवा त्याबद्दल सतत विचार करतात.

पॉलीग्राफ टेस्ट

आरोपीच्या चारित्र्याचं मूल्यांकन करण्यासाठी सायकोलॉजिकल टेस्ट हा काही एकमेव पर्याय नाही. पॉलीग्राफ, ब्रेन मॅपिंग, नार्कोॲनालिसिस यांचीही मदत घेतली जाऊ शकते. कोलकाता प्रकरणातील आरोपी संजय रॉय, आर जी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची पॉलिग्राफ चाचणीही केली जाणार आहे. घटनेच्या रात्री चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी पीडित महिला डॉक्टरसोबत रात्री जेवण केलं होतं. हे लोक चौकशीदरम्यान खरं बोलत नाहीयेत किंवा काहीतरी लपवत आहेत, असा सीबीआयला संशय आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पॉलीग्राफ टेस्ट चर्चेत आली आहे. अर्थातच पॉलीग्राफ चाचणीचा निकाल हा आरोपीचा ‘कबुलीजबाब’ मानला जात नाही आणि न्यायालयात ते स्वीकार्य नाही. तरीसुद्धा ही चाचणी फक्त तपासकर्त्यांना त्यांच्या तपासात मदत करण्यासाठी आणि संशयितांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी केली जाते. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी असल्याचं वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही.

पॉलीग्राफ टेस्ट म्हणजे काय?

आरोपीच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी अनेकदा पॉलीग्राफ टेस्ट (Polygraph Test) केली जाते. यामध्ये लाय डिटेक्टर मशीनच्या (खोटं पकडणारी मशीन) आधारे आरोपीचं खोटं पकडण्याचा प्रयत्न केला जातो. विविध प्रश्नांची उत्तरं देताना आरोपीच्या शरीरात होणाऱ्या बदलावरून तो सत्य बोलतोय की नाही हे कळण्यास मदत होते. या टेस्टमध्ये आरोपीच्या शारीरिक हालचालींचं चांगल्याप्रकारे निरीक्षण केलं जातं. पॉलीग्राफ किंवा लाय डिटेक्टर टेस्ट ही आरोपी आणि न्यायालयाच्या संमतीनंतरच केली जाऊ शकते.

पॉलीग्राफ मशीन कसं काम करतं?

हे एक मशीन असतं आणि त्याचे विविध भाग असतात. त्यापैकी काही युनिट्स आरोपीच्या शरीरावर लावले जातात. आरोपी जेव्हा उत्तर देतो, तेव्हा त्याच्या शरीरावर लावलेल्या युनिट्समधून डेटा मिळत जाते. शरीराला कनेक्ट केल्या जाणाऱ्या युनिट्समध्ये न्यूमोग्राफ, कार्डिओवस्क्युलर रेकॉर्डर आणि गॅल्वेनोमीटर यांचा समावेश असतो. त्याचसोबत हातावर पल्स कफ आणि बोटांवर लोमब्रोसो ग्लव्ह्स बांधले जातात. तज्ज्ञांच्या मते, या चाचणीदरम्यान खोटं बोलल्यास हृदयाचे ठोके वाढणे, श्वासोच्छवास जलदगतीने होणे, घाम येणं यांसारखे बदल शरीरात होऊ लागतात. चाचणीदरम्यान रक्तदाब, नाडी, रक्तप्रवाह इत्यादी गोष्टी मोजल्या जातात. यावरून आरोपी खरं बोलतोय की खोटं हे समजण्यास मदत होते.

या चाचणीदरम्यान आरोपीला आधी सर्वसामान्य प्रश्न विचारले जातात, ज्यांचा खटल्याशी काहीच देणंघेणं नसतं. नंतर बहुतांश प्रश्न हे हो किंवा नाही या फॉरमॅटमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरं देताना आरोपीच्या पल्स रेट, ब्लड प्रेशर, श्वासोच्छवास, चेहऱ्यावरील बदल यांची नोंद केली जाते आणि त्यावरून ग्राफच्या माध्यमातून अहवाल मिळतो.

पॉलीग्राफ टेस्टच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह

पॉलीग्राफ चाचणीचा अहवाल हा अचूक असेलच असं नाही. या चाचणीच्या अचूकतेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही चाचणी न्यायालयात पुरावा म्हणून स्वीकारली जात नाही. अनेकदा पॉलीग्राफ टेस्टदरम्यान आरोपी अधिक तणावात किंवा चिंताग्रस्त असल्यास त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो. एखादी व्यक्त खरं बोलत असेल, पण तणावाखाली आल्याने त्याच्या शरीरात बदल होऊन टेस्टचे परिणाम चुकीचे दाखवले जाऊ शकतात.

सीबीआयने सियालदह न्यायालयात कोलकाता प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी परवानगी मागितली होती. सीबीआयला ही परवानगी देण्यात आली आहे. संजय रॉयच्या घटनेच्या एका दिवसानंतर अटक करण्यात आली होती. सीबीआयने मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची शुक्रवारपासून 75 पेक्षा अधिक तास चौकशी केली आहे. इतर चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?
... तर लाडक्या बहिणी आम्हाला लाटणं घेऊन मारतील, भुजबळ काय म्हणाले?.
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य
'तुझ्या चेहऱ्यासारखा..', शरद पवारांवर सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त वक्तव्य.
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा
अजितदादा रामराजे निंबाळकरांविरोधात संतापले, नोटीस पाठवण्याची केली भाषा.
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका
पप्पू नावाचं घुबड जातींमध्ये भेद..., गोविंदगिरींची राहुल गांधींवर टीका.
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी
'मी अजून किती दाढी पिकवायची?' निलेश राणे यांची मिश्किल फटकेबाजी.
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”
“ते डाव्या विचारसरणीचे, काँग्रेसच्या विचारांना बगल अन् लाल संविधान...”.
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा
दादांकडून जाहीरनामा सादर, बारामती मतदारसंघासाठी 'या' मोठ्या घोषणा.
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर..
सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकी, ५ कोटी द्या, नाहीतर...
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी
विधानसभेची रणधुमाळी सुरू अन् भाजपमधून 37 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी.
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?
'दादांच्या घड्याळाचे 12 वाजलेत, जसं काय ट्रम्पच्या..', कोणाचा टोला?.