
एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. 15 महिन्याच्या निष्पाप मुलीला डे-केअरमध्ये बेदम मारहाण करण्यात आलीये. तिचा गळा दाबण्यात आला, पेन्सिल तोंडात घातली, तिच्या शरीराच्या अनेक भागांवर चावा घेतला, प्लॅस्टिकच्या बेल्टने मारहाण करण्यात आली. फक्त हेच नाही तर तिला कडेवर घेऊन अनेकदा जमिनीवर फेकण्यात आले आणि फरशीवर आपटण्यात आले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पाहून 15 महिन्याच्या मुलीच्या आईला धक्का बसला असून इतर व्हिडीओ पाहण्याची हिंमत आपल्यात नसल्याचे तिने म्हटले.
ही घटना नोएडातील डे-केअर सेंटरमध्ये घडलीये. मुलीसोबत काय घडले हे सांगताना आई ढसाढसा रडताना दिसली. मुलीची आई म्हणाली की, 4 ऑगस्टच्या सकाळी माझे पती आमच्या 15 महिन्याच्या मुलीला डे-केअरमध्ये सोडून ऑफिसला गेले. त्यानंतर मी दुपारी साडेबाराच्या अंदाजात माझ्या मुलीला घेण्यासाठी डे-केअरमध्ये गेले. त्यावेळी तिन्ही टिचर या गेटवरच थांबल्या होत्या आणि त्यांनी मला म्हटले की, बहुतेक तुमच्या मुलीला चिकनपॉक्स झालाय.
तुमची मुलगी सतत रडत आहे. त्यानंतर मी मुलीला घेऊन निघाले पण मुलीची स्थिती पाहून माझ्या मनात संशय आला आणि मी त्यानंतर तिला घेऊन दवाखान्यात गेले. त्यावेळी मला डॉक्टरांनी सांगितले की, तुमच्या मुलीसोबत मारहाण झाली आहे आणि लगेचच बघा हे कुठे तिच्यासोबत झाले. यानंतर मी डे-केअरमध्ये पोहोचले आणि त्यांना याबद्दल विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, इथे काहीच झाले नसून घरी किंवा दवाखान्यात तिच्यासोबत ही घटना घडली असेल.
मी डे-केअरला माझी मुलगी ज्यावेळी तिथे होती, त्याचे सीसीटीव्ही मागितले असता त्यांनी मला हे सीसीटीव्ही देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर केस करण्यास जात असताना अनेक लोकांनी माझ्यावर दबाव टाकला आणि केस करण्यास मनाई केली. त्यांच्याकडून माफीनामा घ्या आणि विषय संपवा असे सांगण्यात आले. ज्यावेळी केस करू दिली जात नव्हती डे-केअरचे मालक चारू अरोरा आणि एक पोलिस कर्मचारीही उपस्थित होता.
ज्यावेळी सीसीटीव्ही फुटेज मी बघितले त्यावेळी माझ्या पायाखालची जमिन सरकली. डे-केअरमध्ये मुलांना सांभाळणाऱ्या बाईने चक्क माझ्या मुलीचा गळा दाबला, तिच्या तोंडात पेन्सिल घातली तिला जमिनीवर फेकून फेकून मारले. भिंतीवर तिचे डोके आदळ होती. तब्बल 45 मिनिच मुलीसोबत ही मारहाण सुरू होती. पोलिसांनी आता या प्रकरणात केस दाखल केली आहे. फक्त त्या डे-केअरमध्ये मुलांना सांभाळणाऱ्या बाईवरच नाही तर डे-केअरच्या मालकावरही गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी मुलीच्या आईने केलीये.