दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ‘जैश’च्या दोन दहशतवाद्यांना अटक

लिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून दिल्लीतील आणखी काही भागांमध्ये छापे टाकले जाण्याची शक्यता आहे. | Delhi terror attack attempt

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:01 AM, 17 Nov 2020
Major terror attack foiled Jaish-e-Mohammad Two suspected militants arrested in Delhi

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दहशतवादी हल्ल्याचा (terror attack ) कट उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांकडून सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. सध्या या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरु आहे. (Major terror attack foiled 2 Jaish-e-Mohammad terrorists arrested in Delhi)

प्राथमिक माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी काल रात्री छापा टाकून या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पिस्तुल आणि 10 जिवंत काडतुसं जप्त केली. हे दोन्ही दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील रहिवाशी असल्याचे समजते. अब्दुल लतीफ मीर आणि मोहम्मद अश्रफ अशी त्यांची नावे असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना पकडण्यासाठी सराय काले खा येथील मिलेनियम पार्क परिसरात सापळा रचण्यात आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास हे दोघे तिकडे आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

या घटनेनंतर दिल्लीतील पोलीस यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून दिल्लीतील आणखी काही भागांमध्ये छापे टाकले जाण्याची शक्यता आहे.

नेपाळमार्गे पाकिस्तानला पळून जायचा होता प्लॅन
या दोघांनी काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय लष्करामुळे त्यांचा हा प्रयत्न फसला होता. त्यामुळे या दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे पाकिस्तानात जाण्याची योजना आखली होती. दिल्लीत बॉम्बस्फोट करून नेपाळमध्ये जायचे, असे त्यांनी ठरवले होते.  यापूर्वी ऑगस्ट महिन्यात दिल्ली पोलिसांनी एका दहशतवाद्याला पकडले होते. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 15 किलो स्फोटके हस्तगत केली होती.

संबंधित बातम्या:

आजोबाच्या मृतदेहावर नातू, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचं हृदय पिळवटून टाकणारं दृश्य

पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद, कोल्हापूरचे ऋषीकेश जोंधळे यांना 20व्या वर्षी वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या 3 नेत्यांची गोळ्या झाडून हत्या

बदला घेतला! भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानी चौक्या, पाहा तुफानी हल्ल्याचा VIDEO

(Major terror attack foiled 2 Jaish-e-Mohammad terrorists arrested in Delhi)