Maratha OBC Reservation : मराठा आरक्षणावरुन रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं, ओबीसी आरक्षणावरुनही टोला

राजकीय परिस्थिती बदलली तर तुम्ही केंद्राकडे बोट दाखवत आहात. त्यावेळी जर तुम्ही कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेतला असता तर ही वेळ आली नसती, असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.

Maratha OBC Reservation : मराठा आरक्षणावरुन रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं, ओबीसी आरक्षणावरुनही टोला
रावसाहेब दानवे,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री


नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा महाविकास विकास आघाडी सरकारला फटकारलं आहे. नारायण राणे समिती स्थापन केली आणि त्या आधारावर तुम्ही आरक्षण दिलं. त्या काळात केंद्र आणि राज्यातही तुमचं सरकार होतं. जर हा विषय केंद्राचा होता तर मग केंद्राला डावलून तुम्ही आरक्षण कसं दिलं? असा सवाल रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचारलाय. आज राजकीय परिस्थिती बदलली तर तुम्ही केंद्राकडे बोट दाखवत आहात. त्यावेळी जर तुम्ही कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेतला असता तर ही वेळ आली नसती, असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे. (Raosaheb Danve criticizes Mahavikas Aghadi government over reservation issue)

मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण यांनी घालवलं. ज्या गोष्टीत यांना अपयश येतं त्या गोष्टीबाबत हे केंद्राकडे बोट दाखवतात. सगळे विषय केंद्राकडे ढकलायचे, मग हे काय करतात? मुळात हे अनैसर्गिक सरकार आहे. अमर, अकबर, अॅन्थनीचं सरकार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर ज्या प्रमाणे एकाचं तोंड एकिकडे तर दुसऱ्याचं दुसरीकडे असं तसंच या सरकारचं आहे. राज्य सरकारमध्ये अंतर्गत कलह आहे, म्हणूनच हे निर्णय करु शकत नाहीत. त्याचा फटका जनतेला बसत असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी केलीय.

ओबीसी आरक्षणावरुन वडेट्टीवारांना टोला

राज्यघटनेत ज्या तरतुदी आहेत त्यास अधीन राहुनच सरकार निर्णय घेणार. कोणत्याही घटकावर अन्याय केला जाणार नाही. आम्ही ओबीसी समाजाच्या विरोधात नााही. भाजपमध्ये आधापासूनच मंडल आयोग लागू आहे. गोपीनाथ मुंडे, ना. स. फरांदे, भाऊसाहेब फुंडकर, पंकजा मुंडे हे सर्व भाजपचे ओबीसी समाजाचे नेते आहेत. ओबीसींना मुख्य पदावर प्रतिनिधीत्व देणारी ही एकमेव पार्टी आहे, असा दावाही दानवे यांनी केलाय.

संजय राऊतांची रावसाहेब दानवेंवर टीका

शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे, असं रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलं होतं. त्याचाही राऊत यांनी अत्यंत तिखट शब्दात समाचार घेतला. आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू. कोचिंग करू त्यांचे. पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

आधी आरक्षण द्या, मग आम्हाला शिकवा, मराठा आरक्षणावर दानवेंचं कोचिंग करू; संजय राऊतांचा घणाघाती हल्ला

मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत तापणार?; शिवसेना खासदार घेणार पंतप्रधानांची भेट

Raosaheb Danve criticizes Mahavikas Aghadi government over reservation issue

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI