जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचं स्वप्न दाखवणारा मोहित गोयल 200 कोटींच्या घोटाळ्यात अटकेत

सुक्यामेव्याच्या व्यवसायात व्यापाऱ्यांची जवळपास 200 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप मोहित गोयलवर आहे (Mohit Goel arrested in Dry Fruit Scam)

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचं स्वप्न दाखवणारा मोहित गोयल 200 कोटींच्या घोटाळ्यात अटकेत

नवी दिल्ली : अडीचशे रुपयात स्मार्टफोनचं स्वप्न दाखवणारा उद्योजक मोहित गोयल (Mohit Goel arrested) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जवळपास दोनशे कोटी रुपयांच्या ड्राय फ्रूट्स घोटाळ्यात त्याला अटक झाली आहे. फ्रीडम 251 (Freedom 251) हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणण्याची घोषणा मोहितने केली होती. (Mohit Goel arrested in Dry Fruit Scam)

सुक्यामेव्याच्या व्यवसायात व्यापाऱ्यांची जवळपास 200 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप मोहित गोयलवर आहे. मोहित गोयल पाच साथीदारांसोबत नोएडा सेक्टर 62 मध्ये ड्रायफ्रुट्स कंपनी चालवत होता. ‘दुबई ड्राय फ्रूट्स अँड स्पाईसेस हब’ असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीच्या माध्यमातून गोयलने घोटाळा केल्याचा आरोप आहे.

कसा चालायचा घोटाळा?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहित गोयल आपल्या कंपनीच्या माध्यमातून देशाच्या विविध भागातील व्यापाऱ्यांकडून चढ्या दराने सुकामेवा खरेदी करायचा. वेळेत पैसे देऊन त्यांचा विश्वास त्याने संपादन केला. त्यानंतर मोठमोठ्या ऑर्डर देऊन 40 टक्के रक्कम नेट बँकिंगच्या माध्यमातून आगाऊ भरली जात असे. उर्वरित रक्कम चेकच्या माध्यमातून देण्याचं आश्वासन दिलं जाई. मात्र चेक बँकेत गेल्यानंतर बाऊन्स व्हायचा. व्यापाऱ्यांकडून ड्रायफ्रूट्सची ऑर्डर पूर्ण घेऊन त्याचं पेमेंट मात्र अर्धवटच दिलं जाई. हे ड्रायफ्रूट्स बाजारात आणखी महाग विकून ते बक्कळ पैसा कमवत असत.

जवळपास 40 व्यापाऱ्यांनी फसवणुकीच्या तक्रारी केल्यानंतर नोएडा पोलिसांनी मोहित गोयलच्या कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला. उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांतून या तक्रारी आल्या होत्या. मोहित गोयलसह त्याचा साथीदार ओमप्रकाश जानगिदला पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून एक ऑडी कार, 60 किलो ड्रायफ्रूट्स आणि काही कागदपत्रं जप्त केली आहेत. पसार झालेल्या अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

मोहित गोयल आधीही जेरबंद

मोहित गोयलला 2017 मध्ये रिंगिंग बेल्स फ्रॉडमध्ये सर्वात आधी अटक झाली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्याने मास्टर फ्रीडम कंपनी या नावे एक फर्म सुरु केली. 2399 रुपयात मोबाइल, आणि 9900 रुपयात एलईडी टीव्हीची विक्री त्याने सुरु केली. या व्यवसायातही फसवणुकीच्या तक्रारी आल्या आणि मोहित पुन्हा गोत्यात आला. 2018 मध्ये फॅमिली ऑफ ड्राय फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, त्यानंतर श्री श्याम ट्रेडिंग ड्राय फूड्स, आयुर्वेदिक कमोडिटीज अशा एकामागून एक कंपन्यांविरोधातही गोयलवर तक्रारी आल्या होत्या. (Mohit Goel arrested in Dry Fruit Scam)

(Mohit Goel arrested in Dry Fruit Scam)

Published On - 10:41 am, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI