
मुंबईवर 2008 साली झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसैन राणाला आज गुरुवारी भारतात आणण्यात येईल. 64 वर्षीय तहव्वुर राणा, पाकिस्तानात जन्मलेला कॅनडाचा नागरिक आहे. लॉस एंजेलिसच्या मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटरमध्ये तो बंद होता. मुंबईवरील हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार डेविड कोलमॅन हेडली उर्फ दाऊद गिलानीचा तो जवळचा सहकारी मानला जातो. फेब्रुवारी महिन्यात हाइट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक बैठक झाली होती. त्यावेळी ट्रम्प म्हणालेले की, अमेरिकेने एका खतरनाक दहशतवाद्याला भारतात पाठवण्याची परवानगी दिली आहे. त्याला आता भारतात आणण्यात येत आहे.
भारतात आणल्यानंतर तहव्वुर राणाला दिल्लीच्या तिहार जेलमधील हाय सिक्योरिटी वार्डमध्ये ठेवण्यात येईल. जेल प्रशासनने विशेष व्यवस्था केली आहे. मुंबईवरील हल्ल्याच्या 16 वर्षानंतर तहव्वुर हुसैन राणाला भारतात आणलं जातय. या संदर्भात सर्व सामान्य जनता आणि पीडित व्यक्तीच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
वेगळा कायदा पाहिजे
मोहम्मद तौफीक ऊर्फ ‘छोटू चाय वाला’ त्याच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले होते. त्याने म्हटलं की, “भारतात तहव्वुर राणा सारख्या दहशतवाद्याला कोणतीही सुविधा मिळू नये. कसाबला जशी बिर्याणी आणि आराम मिळाला, तशी सुविधा याला मिळू नये. अशा दहशतवाद्यांसाठी वेगळा कायदा असला पाहिजे, ज्यामुळे त्यांना 2 ते 3 महिन्यात फाशीची शिक्षा होईल”
देविका नटवरलालने काय मागणी केली?
“तहव्वुर राणाला अखेर भारतात आणलं जातय याचा मला खूप आनंद आहे. भारताचा हा दहशतवादाविरुद्ध मोठा विजय आहे. म्हणून मी भरपूर खुश आहे. मी भारत आणि अमेरिकेच्या सरकारचे आभार मानते. अमेरिकेच्या सरकारने भारताला भरपूर साथ दिली. राणाला परत आणताच त्याच्याकडून माहिती मिळवायला सुरुवात करा. पाकिस्तानात अजूनही लपून बसलेल्या दहशतवाद्यांबद्दल त्याच्याकडून माहिती घ्या. 26/11 ची प्लानिंग आणि असं का केलं? हे त्याला विचारा. तहव्वुर राणाला लवकरच फाशीची शिक्षा द्या” अशी इच्छा मुंबई हल्ल्यातील पीडित देविका नटवरलाल रोटावनने व्यक्त केली.