सेल्फीने केला घात, 1 कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी चलपती असा ठार झाला, Inside Story वाचली का?
Chalpati Encounter Naxalists : 30 वर्षे नक्षली चळवळीला खतपाणी घालणारा, अनेक देशविघातक कारवायांमध्ये अग्रेसर असलेला नक्षलवादी चलपती एनकाऊंटरमध्ये ठार झाला. पत्नीसोबत घेण्याचा मोहाने त्याचा घात केला.

छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशासह तेलंगाणापर्यंत अनेक नक्षली कारवायांचा म्होरक्या चलपती सुरक्षा रक्षकांच्या एनकाऊंटरमध्ये मारल्या गेला. त्याच्या डोक्यावर थोडे थोडके नाही तर 1 कोटींचे बक्षीस होते. अनेक दशकांपासून या घनदाट जंगलावर त्याचे राज्य होते. आदिवासींमध्ये दहशत होती. एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी अगदी बेमालूमपणे जाण्यात तो पटाईत होता. त्याचे धागेदोरे तो लवकर कळू देत नसे. पोलिसांना आपली कोणतीच गोष्ट माहिती न होण्याची तो काळजी घेत होता. पण पत्नीसोबतच्या एका सेल्फीने त्याचा घात केला, त्याचे यमलोकाचे तिकीट फाटले.
चलपतीचे जंगलराज
चलपती गेल्या तीसहून अधिक वर्षापासून तो केंद्र आणि राज्य सरकारला आव्हान देत होता. नक्षली चळवळीला बळ देण्याचे मोठे काम त्याने केले. घनदाट जंगलांमध्ये नवीन तरुणांना प्रशिक्षण देणे. त्यांच्या समित्या स्थापन करणे, विभाग वाटून देणे, विविध कामं सोपवणे, वसूली करणे हे सर्व कामे चोखपणे बजावून घेण्यात चलपती निष्णात आणि धूर्त होता. आतापर्यंत त्याने स्वत:चे स्केच सुद्धा बाहेर येऊ दिले नव्हते. पण चलपतीची गुप्त माहिती सुरक्षा रक्षकांनी अगोदरच काढली होती. पत्नी सोबत सेल्फी काढल्यानंतर तो एकदम रडारवर आला आणि शोध मोहिमेत ठार झाला.




चलपतीची अनेक नावे
चलपती हा मूळचा आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील रहिवाशी होता. त्याचे मूळ नाव रामचंद्र रेड्डी असे होते. तरुणपणीच तो या नक्षली चळवळीच्या संपर्कात आला. पोलीस रेकॉर्डमध्ये त्याचे नाव प्रताप रेड्डी, रामचंद्र रेड्डी, अप्पाराव, चलपती, जयराम आणि रामू असे समोर आले आहे. चलपतीने इयत्ता 10 वीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पण नक्षली चळवळी जणू त्याच्या इशाऱ्यावर गेल्या काही दशकांपासून सुरू होती.
चलपतीचे वय आता 60 वर्षांच्या घरात होते. त्याला वयामुळे जास्त फिरता येत नव्हते. तो छत्तीसगडसह ओडिसा राज्यात जास्त सक्रिय होता. बस्तर जिल्ह्यातील दरभा परिसरात तो असल्याची कुणकुण लागली होती. त्यातच त्याची सेल्फी समोर आली. सुरक्षा रक्षकांशी झालेल्या चकमकीत तो ठार झाला. त्याला तेलगू, हिंदी, इंग्रजी, उडिया भाषा येत होत्या.