Congress: मोठी बातमी, 24 अकबर रोडवरील राष्ट्रीय मुख्यालय रिकामे करण्याची नोटीस, काँग्रेसपुढे आता पर्याय काय?
Congress Party Office: नवी दिल्लीतील 24 अकबर रोडवरील मुख्यालय रिकामे करण्याची नोटीस काँग्रेसला मिळाली आहे. पक्ष सरकारकडून अजून काही दिवस सवलतीची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसपुढे आता पर्याय काय उरला आहे असा प्रश्न विचारल्या जात आहे.

Congress Party Office: काँग्रेस पक्षाने आपले राष्ट्रीय मुख्यालय 24 अकबर रोड आणि 5 रायसीना रोडवरील कार्यालय रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की पक्षाचे कार्यालय सोडण्यासाठी त्यांना 28 मार्च रोजी अखेरची संधी देण्यात आली आहे. इंदिरा गांधींच्या काळापासून 24 अकबर रोडवर काँग्रेसचे कार्यालय होते. हे कार्यालय अनेक ऐतिहासिक निर्णय आणि घटनाक्रमांचे साक्षीदार आहे. याप्रकरणी माहितीगार नेत्यांनी आता याप्रकरणी मोठे वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्ष आता कायदेशीर पर्यायांचा विचार करत असल्याचे ते म्हणाले. तर त्याचवेळी सरकारकडे अजून काही दिवसांची सवलत मागण्यात येणार आहे. यादरम्यान अशोक गहलोत आणि दिग्विजय सिंह सारख्या वरिष्ठ नेत्यांना राज्यसभेत घेऊन त्यांच्या नावावर हे मुख्यालय करता येईल. ते राज्यसभेत येताच, त्यांच्या नावावर बंगला सुटण्याची शक्यता आहे.
अलाहाबाद नंतर नवी दिल्लीच मुख्यालय
गेल्या कित्येक वर्षांपासून 10 जनपथ आणि 24 अकबर रोड या दरम्यान विश्वासाचे नाते टिकून आहेत. एकमेकांजवळील या दोन्ही वास्तू दिमाखानं उभ्या आहेत. या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या बैठकी झाल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात मोतीलाल नेहरू यांचे अलाहाबाद येथील घर आनंद भवन हेच काँग्रेसचे मुख्यालय होते. 1947 नंतर मुख्यालय दिल्लीत स्थलांतरित करण्यात आले. 1969 मध्ये जेव्हा काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. तेव्हा काँग्रेसचे 7, जंतर मंतरवरील प्रभुत्व कमी झाले. इंदिरा गांधी यांनी विंडसर प्लेस येथे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते एम. व्ही. कृष्णप्पा यांच्या घरी एक तात्पुरते कार्यालय सुरू केले. 1971 मध्ये काँग्रेसचे कार्यालय 5, राजेंद्र प्रसाद रोडवर स्थलांतरीत झाले. त्यानंतर हे कार्यालय 1978 मध्ये 24, अकबर रोडवर सुरू करण्यात आले.
जानेवारी 2025 मध्ये इंदिरा भवनाचे उद्धघाटन
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जानेवारी, 2025 मध्ये नवी दिल्लीत पक्षाचे नवीन मुख्यालय ‘इंदिरा भवन’ याचे उद्धघाटन करण्यात आले. या उद्धघाटन समारंभात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी वाड्रा, पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. हे नवीन मुख्य कार्यालय लोकशाही, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, सर्वांचा विकास आणि सामाजिक न्यायाच्या सिद्धांतावर आधारीत असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की नवीन मुख्य कार्यालय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 140 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिक आहे असे खर्गे म्हणाले होते. तर पक्षाचे मुख्य कार्यालय हे महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू आणि पक्षाच्या इतर नेत्यांचे मूल्य दाखवतात असे राहुल गांधी म्हणाले.
