‘ऑपरेशन सिंदूर’वर पहिल्यांदाच बोलले अजित डोभाल, म्हणाले, ‘असा फोटो दाखवा ज्यामध्ये…’
Operation Sindoor: पाकिस्तानने हे केले आहे, ते केले, असे म्हटले जाते. पण तुम्ही मला असा एकही फोटो दाखवू शकाल का? ज्यामध्ये असे दिसून येईल की या काळात भारताचे काही नुकसान झाले आहे? अगदी आमचा एक काच सुद्धा फुटला नाही.

Operation Sindoor: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी पहिल्यांदा ऑपरेशन सिंदूरवर वक्तव्य केले. डोभाल यांनी शुक्रवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने अचूक स्ट्राइक केली. ज्यामध्ये पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. आम्हाला कोण कुठे आहे, हे माहीत होते. अनेक परदेशी माध्यमांनी म्हटले की, पाकिस्तानने हे केले, पाकिस्तानने ते केले, पण मला असा फोटो दाखवा ज्यामध्ये भारताचे नुकसान दिसून येईल. अगदी आमचा एक काच सुद्धा फुटला नाही. आम्ही कोणतीही चूक केली नाही. आम्ही अचूक होतो.
स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर
एनएसए अजित डोभाल म्हणाले, तंत्रज्ञान आणि युद्ध यांच्यातील संबंध नेहमीच महत्त्वाचा असतो. आम्हाला ऑपरेशन सिंदूरचा अभिमान आहे. आम्हाला अभिमान आहे की या दरम्यान आम्ही स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला. आम्ही सीमेपलीकडे असलेल्या नऊ पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचे ठरवले होते. यापैकी एकही तळ सीमेजवळ नव्हता. आमचे सर्व लक्ष्य अचूक होते. आम्ही फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. संपूर्ण ऑपरेशन ७ मे रोजी पहाटे १ नंतर सुरू झाले आणि जेमतेम २३ मिनिटे चालले.
परदेशी माध्यमांना दाखवला आरसा
आयआयटी मद्रासच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात बोलताना अजित डोभाल म्हणाले, पाकिस्तानने हे केले आहे, ते केले, असे म्हटले जाते. पण तुम्ही मला असा एकही फोटो दाखवू शकाल का? ज्यामध्ये असे दिसून येईल की या काळात भारताचे काही नुकसान झाले आहे? सिंदूर ऑपरेशनच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या न्यूयॉर्क टाईम्ससह आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या कव्हरेजवर डोभाल यांनी रोखठोकपणे हे उत्तर दिले. ते पुढे म्हणाले, त्या माध्यमांनी त्यांना जे हवे होते ते लिहिले. पण उपग्रहांकडून मिळालेले फोटो १० मे च्या आधी आणि नंतर पाकिस्तानातील हवाई तळांवर काय घडले, त्याची खरी कहाणी सांगतात.
आयआयटीचे केले कौतूक
भारतीय तंत्रज्ञानावर विश्वास व्यक्त करताना अजित डोभाल यांनी सांगितले की, आमच्या सर्व स्वदेशी प्राणालीने सर्वोत्तम काम केले. मग ती ब्राह्मोस असो की एअर डिफेन्स सिस्टीम. आता तंत्रज्ञानाच्या लढाईत हरणे आणि इतरांपेक्षा मागे पडणे देशाला परवडणारे नाही. आयआयटीचे कौतूक करताना ते म्हणाले, चीनने 5G तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी 12 वर्षांहून अधिक काळ घेतला आणि 300 अब्ज डॉलर्स खर्च केले. पण आयआयटी मद्रासने खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून अडीच वर्षात 5G विकसित केले.
