Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या 6 वीर जवानांची नावे प्रथमच जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर मिळणार स्थान
भारताने पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील ९ लष्करी आणि अतिरेकी ठिकाणांना नष्ट करणारे ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या यु्द्धातील शहीद भारतीय जवानांची नावे प्रथमच भारताने जाहीर केली आहेत.

पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांची निर्घृण हत्या झाल्यानंतर संतापलेल्या भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवले होते. भीषण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही मोहिम राबिवली होती. या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सैनिकांनी अचाट पराक्रम करीत पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले. या ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीर झालेल्या सहा वीर जवानांची नावे भारताने प्रथमच जाहीर केली आहेत. या बहादूर सैनिकांच्या पराक्रमाला राष्ट्रीय युद्ध स्मारकावर स्थान मिळणार आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानच्या आत जाऊन खोलवर लढाऊ विमानांनी मारा केला होता.७ मे २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ तळांना संपूर्ण नष्ट करण्यात आले होते. भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करीत त्यांना संपूर्णपणे उद्धवस्त केले होते. या ८८ तासांच्या ऑपरेशनमध्ये भारताने स्वदेशी तंत्रज्ञान (उदा. ब्रह्मोस क्षेपणास्त्र) वापरून पाकिस्तानची शस्त्रे निष्प्रभ केली होती.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शहीद झालेल्या शुर वीरांची नावे आज भारताने जाहीर केली आहेत. यात खालील वीर जवानांची नावे आहेत.
१ ) सुभेदार मेजर पवन कुमार,
२) रायफल मॅन सुनील कुमार,
३)लान्स नायक दिनेश कुमार,
४) अग्निवीर मूड मुरली नाईक,
५) हवालदार सुनील कुमार सिंह,
६) सार्जंट सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे.
या ऑपरेशन सिंदूरबाबत सरकारने आतापर्यंत शहीद वीरांची नावे जाहीर केली नव्हती. आज ही नावे सरकारने प्रथमच जाहीर केली आहेत. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही असेही सरकारने म्हटले होते. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या ९ ठिकाणांना नष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे, ७ मेच्या मध्यरात्री अवघ्या 25 मिनिटांमध्ये अत्यंत नियोजन पद्धतीने पाकिस्तानला सावध करत ही कारवाई करण्यात आली होती. मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांनी सुरू झालेले हे ‘ऑपरेशन सिंदूर’ १ वाजून ३० मिनिटांपर्यंत चालल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलाने दिली होती. यानंतर हे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले. या ऑपरेशनच्या आधी भारत सरकारने सिंधू नदी करार देखील रद्द केला होता. त्यानंतर अनेक कूटनितीचे मार्ग वापरत पाकिस्तानला एकटे पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर हा हल्ला करण्यात आला होता.
