ज्या भारतीय क्षेपणास्त्राला पाकिस्तान- चीन घाबरतात, त्याचे सीक्रेट पाकिस्तानला देणाऱ्या इंजिनिअरला जन्मठेप
Life imprisonment to ex-Brahmos engineer : डीआरडीओच्या 'यंग सायंटिस्ट' पुरस्कारानेही निशांत अग्रवाल याला सन्मानित करण्यात आले. तो एनआयटी कुरुक्षेत्र येथील माजी विद्यार्थी आहे. निशांत हा ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित माहिती आयएसआयला पाठवत असल्याचे तपासातून समोर आले आहे.

भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र जगातील शत्रू राष्ट्रांमध्ये धडकी भरवते. पाकिस्तान आणि चीन त्याला थरथर कापतात. परंतु ‘शेतानेच कुंपन खाल्ले’ असा प्रकार झाला. भारताच्या इंजिनिअरने असाच प्रकार केला. नागपूर जिल्हा न्यायालयाने त्या अभियंत्याला अद्यल घडवली आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. निशांत अग्रवाल असे त्याचे नाव आहे. ब्रह्मोस एयरोस्पेसमध्ये तो अभियंता होता. तसेच ऑफिशियल सीक्रेट अॅक्टनुसार 14 वर्षांची शिक्षा दिली गेली आहे.
आजीवन जन्मठेपेची शिक्षा
ब्रह्मोस एरोस्पेसचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला नागपूर न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ला दिल्याबद्दल निशांत अग्रवाल याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ माजवली होती. ब्रह्मोस एरोस्पेसशी संबंधित हे पहिले हेरगिरी प्रकरण होते.
अशी दिली माहिती
निशांत अग्रवाल याने नेहा शर्मा आणि पूजा रंजन या दोन फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून संशयित पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात आला होता. इस्लामाबादमधून चालवली जाणारी ही खाती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था चालवतात असे मानले जाते. त्याच्या लॅपटॉपमधून अत्यंत गोपनीय फाइल्स सापडल्या आहेत. याशिवाय एक सॉफ्टवेअरही सापडले, ज्याद्वारे लॅपटॉपमध्ये असलेली संवेदनशील तांत्रिक माहिती परदेशात आणि समाजकंटकांना पाठवली जात होती.
डीआरडीओने केला होता गौरव
डीआरडीओच्या ‘यंग सायंटिस्ट’ पुरस्कारानेही निशांत अग्रवाल याला सन्मानित करण्यात आले. तो एनआयटी कुरुक्षेत्र येथील माजी विद्यार्थी आहे. निशांत हा ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित माहिती आयएसआयला पाठवत असल्याचे तपासातून समोर आले आहे. 2018 मध्ये, जेव्हा तो ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नागपूर स्थित क्षेपणास्त्र केंद्राच्या तांत्रिक संशोधन केंद्रात काम करत होता, तेव्हा त्याला मिलिटरी इंटेलिजन्स आणि यूपी-महाराष्ट्रच्या एटीएसने अटक केली होती. पुणे येथील डीआरडीओचे तत्कालीन संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हनी ट्रॅप प्रकरण मागील वर्षी उघड झाले होते.
