पाकिस्तानची झोप उडाली, थेट नव्या देशाची घोषणा? सरकारविरोधात सर्वात मोठे बंड!
आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोपही काश्मिरी यांनी केला. तसेच आमच्या अनेक सहकाऱ्यांना पकडून देण्यासाठी, जीवे मारण्यासाठी बक्षीस ठेवलेले आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Pok And Pakistan : पाकिस्तानमधील सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. लोकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर आंदोलनाला बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. लोकांच्या या असंतोषाचे नेतृत्त्व जॉईंट आवामी अॅक्शन कमिटीचे (JAAC) प्रमुख नेते सरदार अमन कश्मिरी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना आमचा स्वतंत्र देश तयार करावा, अशी मोठी मागणी केली.
आम्हाला आमचा देश हवा आहे
JAAC तर्फे मुझफ्फराबाद येथे लाँग मार्च काढला जाणार आहे. या मोर्चाच्या अगोदरच अमन काश्मिरी यांनी आम्हाला वेगळा देश हवा आहे, अशी मागणी केली आहे. आमचे हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत चालूच राहील, असा इशराही त्यांनी दिला. आपल्या भाषणात बोलताना, ‘आम्हाला आमचा देश हवा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला देश, आपले सरकार, आपला अधिकार असायला हवा. आमचे अधिकार आम्हाला परत द्या. आता आम्ही कोणाचेही गुलाम बनून राहणार नाही,’ अशी रोखठोक भूमिका काश्मिरी यांनी घेतली.
आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय
या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे, असा आरोपही काश्मिरी यांनी केला. तसेच आमच्या अनेक सहकाऱ्यांना पकडून देण्यासाठी, जीवे मारण्यासाठी बक्षीस ठेवलेले आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आम्ही आमचा जीव आमच्या तळहातावर घेऊन आलो आहोत. आम्ही मागे हटणार नाही, असे काश्मिरी यांनी ठणकावून सांगितले आहे.
आगामी पिढीचे भविष्य या संघर्षावर…
त्यांनी आपल्या भाषणात महिला आणि मुलांचाही उल्लेख केला आहे. आमच्या संघर्षासाठी आम्हाला आमच्या मातांचा पाठिंबा आहे. आमच्या या संंघर्षामागे लहान मुलांच्या आशा आहेत. आगामी पिढीचे भविष्य या संघर्षावर बेतलेले आहे. हा संघर्ष संपूर्ण पाकव्याप्त काश्मीरचा संघर्ष आहे, असे मत यावेळी त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी सरकार या आंदोलनाला कसे संपवणार तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांचा असंतोष कसा शांत करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.