काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली (Parakash Javadekar allegations on Congress).

चेतन पाटील

|

Jan 27, 2021 | 9:40 PM

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी संपूर्ण दिल्ली धुमसली. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण आले. या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले. या प्रकरणावर केंद्र सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली (Parakash Javadekar allegations on Congress).

“भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि यश वाढत आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्टांची लोकप्रियता आणि यश घटत आहे. त्यांना राजकीय घराण्यांची चिंता आहे. लोकांनी त्यांना नाकारलं आहे. मात्र, तीच काँग्रेस अहंकारात लोकांना भडकवण्याचं काम करत आहे. काल दिल्ली पोलिसांनी अद्भूत संयम दाखवला. त्यांच्याजवळ शस्त्र होते. मात्र, त्यांनी चालवले नाहीत. तलवारीने, काठ्यांनी प्रहार झाले तरीही पोलिसांनी संयम दाखवलं. हे निश्चितच प्रशंसनीय काम आहे”, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.

“सरकारने तर दहा वेळा चर्चा केलीय. वर्ष-दीडवर्ष कायदा थांबवण्याची आणि स्थगिती करण्याची तयारी दाखवली आहे. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे कोणते अधिकार कमी झाले आहेत? एमएसपी, मंडी, मालकी हक्क कशालाही ठेच बसलेली नाही. उलट या कायद्यांमधून शेतकऱ्यांना पर्याय सूचवण्याचा मार्ग आहे. काँग्रेसलाही या गोष्टील माहिती आहे. मात्र, काँग्रेसला ते होऊ द्यायचं नाही”, असा आरोप त्यांनी केला.

“निवडणुकीत जे पराभवी झाले आहेत ते देशभरात एकत्र येवून देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. २६ जानेवारीला काँग्रेस अशाप्रकारे शेतकऱ्यांना भडकवू शकते, यावरुन काँग्रेस कोणत्या थरावर आली आहे, त्याचं हे उदाहरण आहे. काँग्रेसच्या भडकवण्याच्या या राजकारणाला लोक नक्की उत्तर देतील”, असं जावडेकर म्हणाले.

“पंजाबमध्ये त्यांचं सरकार असताना हा सर्व प्रकार घडला आहे. काँग्रेसच्या अशा राजनीतीचा आम्ही निषेध करतो. जनताच त्याला योग्य उत्तर देणार आहे. याआधी त्यांनी सीएए कायद्यावेळी असाच प्रयत्न केला होता”, असा आरोप त्यांनी केला (Parakash Javadekar allegations on Congress).

हेही वाचा : Delhi Violence : आंदोलकांनी विश्वासघात केला, आम्ही संयम पाळला – दिल्ली पोलीस

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें