PM Modi 78th Independence Day Speech : 40 कोटी भारतीयांनी महासत्तेला नमवलं, आज तर आपण 140 कोटी…. काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
देश आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक ऐतिहासिक आणि महत्त्वाची वास्तू स्वातंत्र्याच्या रंगात रंगली असली तरी आज पुन्हा सर्वांच्या नजरा पंतप्रधान मोदींकडे लागल्या आहेत. ते 11व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत.

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांनी ध्वजारोहण केलं, त्यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली. लाल किल्ल्यावरील भाषणादरम्याम पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं. ‘ नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सगळ्यांची चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपली जवळची माणस गमावली आहेत. आज मी त्या सर्वांबद्दल संवेदना व्यक्त करतो. मी त्यांना विश्वासाने सांगतो, हा देश संकटकाळात त्यांच्यासोबत आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
– आजचा दिवस देशासाठी बलिदान देणाऱ्या असंख्य ‘आझादी के दिवाने’यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. हा देश सदैव त्यांचा ऋणी राहील.
– गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सर्वांची चिंता वाढली आहे, नैसर्गिक संकटामुळे अनेक लोकांनी स्वकीयांना गमावलं आहे. काहींनी संपत्ती गमावली. देशातील संपत्तीचही मोठं नुकसान झालंय. मी त्या सगळ्यांप्रती आज संवेदना व्यक्त करतो आणि हा विश्वास देतो की हा देश या संकटाच्या काळात त्यांच्यासोबत उभा आहे.
– स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आठवा. शेकडो वर्षांची गुलामगिरी होती, प्रत्येक काळ संघर्षाचा होता. तरुण, महिला, आदिवासी, शेतकरी या सगळ्यांनीच अविरत लढा दिला. 1857 च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आधीही देशाच्या अनेक आदिवासी भागांमधून स्वातंत्र्याचा लढा दिला जात होता, याला इतिहास साक्षी आहे. गुलामगिरीचा एवढा मोठा काळ, जुलुमी शासक, अखंड यातना, सामान्यांचा विश्वास तोडण्याचा प्रत्येक मार्ग हे सगळं असूनही तेव्हाच्या लोकसंख्येनुसार स्वातंत्र्यापूर्वी 40 कोटी देशवासीयांनी संघर्षाचा संकल्प केला. भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं.
– आपल्या नसांमध्ये त्यांचच रक्त आहे याचा आपल्याला गर्व आहे. 40 कोटी लोकांनी जगाच्या महासत्तेला उचलून फेकून दिलं. 40 कोटी लोक स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करू शकतात, तर 140 कोटी देशवासीय, नागरिकांनी ठरवलं, संकल्प केला तर कितीही आव्हानं आली, कितीही कमतरता असल्या, कितीही साधनांसाठी लढा द्यावा लागला तरी सर्व संकटं पार करून आपण समृद्ध भारत, 2047 सालच्या विकसित भारताचं ध्येय साध्य करू शकतो.
– विकसित भारत 2047 हे फक्त भाषणाचे शब्द नाहीत. यामागे कठोर कष्ट सुरू आहेत. कोट्यवधी नागरिकांच्या सूचना घेतल्या जात आहेत. आम्ही देशवासीयांकडून सूचना मागवल्या. देशाच्या कोट्यवधी नागरिकांनी विकसित भारत 2047 साठी अगणित सूचना केल्यात.
– लाल किल्ल्यावरुन देशातील 18 हजार गावात वीज पोहोचणार असं सांगितलं जातं आणि वीज तिथे पोहोचते त्यावेळी विश्वास दृढ होतो” असं पीएम मोदी म्हणाले.
– बँका संकटात होत्या. बँकिंग सेक्टर मजबूत बनवण्यासाठी अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे बँका मजबूत झाल्या. मध्यमवर्गीयांची स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बँकांमध्ये आहे. शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी तसच अन्य कामांसाठी लोन हवं असेल तर ते बँकांमुळे शक्य होतं.
– लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे महत्त्वाचे आहे. या गोष्टी नसताना दलित आणि आदिवासी जगत होते. त्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्याचे परिणाम सर्वांसमोर आहेत. आम्हाला आनंद आहे की आज प्रत्येक जिल्हा उत्पादने बनवत आहे. आज संपूर्ण जग भारताकडून काही ना काही शिकत आहे.
– कोरोनाचं संकट विसरता येणार नाही. जगात सर्वात वेगाने कोट्यवधी लोकांना लसीकरणाचं काम आपल्या याच देशात झालं. कोरोनाच्या काळात आम्ही करोडो लोकांना लसीकरण केले.
– याच देशात कधीकाळी दहशतवादी आपल्याला येऊन मारून निघून जायचे. पण जेव्हा देशाचे सैन्य जेव्हा सर्जिकल स्ट्राईक करते , जेव्हा हवाई हल्ला करतं तेव्हा सर्व देशवासियांचं हृदय अभिमानाने फुलतं, असं पंतप्रधान म्हणाले.