PM मोदींनी शिबू सोरेन यांना रुग्णालयात जाऊन वाहिली श्रद्धांजली, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे केले सांत्वन
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज (सोमवार) सकाळी निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज सोमवारी सकाळी निधन झालं. ते दीर्घकाळापासून आजारी होते. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात वयाच्या 81 व्या वर्शी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडनीशी संबंधित समस्या होती. तसेच त्यांना इतरही आजारांनी ग्रासलेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
PM मोदींनी रुग्णालयात जाऊन वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर गंगाराम रुग्णालयात जाऊन शिबू सोरेन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पंतप्रधानांनी शिबू सोरेन यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
Went to Sir Ganga Ram Hospital to pay homage to Shri Shibu Soren Ji. Also met his family. My thoughts are with Hemant Ji, Kalpana Ji and the admirers of Shri Shibu Soren Ji.@HemantSorenJMM@JMMKalpanaSoren pic.twitter.com/nUG9w56Umc
— Narendra Modi (@narendramodi) August 4, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या कुटुंबियांसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना भेटून मी संवेदना व्यक्त केली. त्यांचे संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी समर्पित होते, ते नेहमीच स्मरणात राहतील.” पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेमंत सोरेन यांना भेटले तेव्हा ते भावूक झाले होते.
झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांना गुरुजी म्हणून ओळखले जायचे. शिबू सोरेन यांना किडनीशी संबंधित आजार होता, त्यामुळे त्यांच्यावर महिनाभरापासून दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांनी आज सकाळी वयाच्या 81 वर्षी शेवटचा श्वास घेतला.
शिबू सोरेन हे तळागाळातील नेते होते
शिबू सोरेन यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले होते की, ‘शिबू सोरेन हे तळागाळातील नेते होते, जनतेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणामुळे ते जननेता बनले. त्यांनी आदिवासी समुदाय, गरीब आणि वंचितांना सक्षम करण्यासाठी काम केले. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.
तीनवेळा मुख्यमंत्री बनले
शिबू सोरेन हे झारखंड राज्य बनवण्यात आघाडीवर होते. तीनवेळा ते झारखंडचे मुख्यमंत्री बनले. एकदाही ते आपला कार्यकाळ पूर्ण करु शकले नाहीत. बिहारपासून वेगळ्या झालेल्या झारखंडचे ते 2005 साली तिसरे मुख्यमंत्री बनले. 2005 साली आपल्या पहिल्या कार्यकाळादरम्यान ते फक्त 10 दिवस, 2008 साली दुसऱ्या कार्यकाळात एक वर्ष आणि तिसऱ्या कार्यकाळात काही महिने मुख्यमंत्री राहिले.
