Mann Ki Baat | भारत मैत्री निभावतो, तसा वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शेजाऱ्यांना उत्तरही देतो, मोदींचा थेट इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये देशातील जनतेला संबोधित केलं (PM Modi on India China Face off Mann ki Baat).

Mann Ki Baat | भारत मैत्री निभावतो, तसा वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शेजाऱ्यांना उत्तरही देतो, मोदींचा थेट इशारा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये देशातील जनतेला संबोधित केलं (PM Modi on India China Face off Mann ki Baat). यावेळी त्यांनी लडाखमधील भारत-चीन तणावापासून इतर अनेक विषयांवर भाष्य केलं. भारताला जशी मैत्री निभावता येते, तशीच कुणी वाकडी नजर करुन पाहिल्यास जशास तसे उत्तरही देता येतं. भारताने लडाखमध्ये देशाच्या सीमेचं चोख रक्षण केलं आणि चीनला सडेतोड उत्तर दिलं, असं मत यावेळी मोदींनी म्हटलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, “लडाखमध्ये भारताच्या जमिनीकडे पाहणाऱ्यांना चांगला धडा दिला आहे. भारत मैत्रिचे संबंध तर निभावतोच, पण जर कुणी वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांना जशास तसे उत्तरही देतो. भारताच्या वीरजवानांनी देशाच्या सीमांचं रक्षण केलं. ज्यांची मुलं शहीद झाले, त्यांचे कुटुंबीय त्यांच्या इतर मुलांनाही सैन्यात भरती करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांचा त्याग पुजनीय आहे.”

“देश आत्मनिर्भर होणे हीच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली आहे. भारतीय जवान शहीद झाल्यावर देशातील अनेक लोकांनी लोकल गोष्टीच खरेदी करण्याचा निश्चय केला आहे. स्वातंत्र्यापूर्वी भारत इतर अनेक देशांच्या तुलनेत पुढे होता. त्यावेळी अनेक देश जे त्यावेळी आपल्या मागे होते ते खूप पुढे गेले. मात्र,स्वातंत्र्यानंतर आपल्याला पुढे जाता आले नाही. मात्र, आता भारत आत्मनिर्भरतेसह पुढे जात आहे. यात आपल्या सर्वांचा सहभाग अत्यावश्यक आहे. तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी कराल आणि त्यासाठी बोलाल तर ती देशाला मजबूत करण्याची भूमिका आहे. ही एकप्रकारे देशसेवाच आहे. प्रत्येक क्षेत्रात देशसेवा करण्यास संधी असते,” असं मोदींनी सांगितलं.


“आगामी गणेशोत्सव साध्या पद्धतीने पर्यावरणपूरक साजरा करा”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी देशभरातील गणेशभक्तांना आगामी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन केलं. तसेच हा उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक होईल यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. यासाठी पीओपीच्या मूर्तींऐवजी मातीच्या मूर्ती वापरण्याचा सल्ला दिला.

‘लॉकडाऊनच्या टप्प्यातून आता आपण अनलॉकच्या टप्प्यात’

नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत जितका मजबूत होईस, तितकी जगात वैश्विक शांततेची शक्यता वाढेल. स्वभावाने वाईट असेल तर ज्ञान, धन, शक्तीचा उपयोगही वाईट होतो. मात्र, स्वभाव चांगला असेल तर त्याचा चांगलाच उपयोग होतो. भारताने नेहमीच चांगल्या स्वभावाने या गोष्टींचा उपयोग केला. आपण याच आदर्शांसह पुढे जात राहू. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन लागू करण्यात आला. आता आपण अनलॉकच्या टप्प्यात आहोत. या काळात आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल. तुम्ही मास्क घातले नाही, इतर नियम पाळले नाही तर अनेकांचं आरोग्य धोक्यात येईल. म्हणून सर्व देशवासीयांना मी बेजबाबदारपणा टाळण्याचं आवाहन करतो.”

‘वर्षातील पहिले 6 महिने खराब गेले म्हणून हे संपूर्ण वर्षच वाईट नाही’

“सध्या सर्व ठिकाणी हे वर्ष लवकर का जात नाही, हे वर्ष चांगलं नाही, हे वर्ष लवकर जावं अशी चर्चा सुरु आहे. आपल्याला 5-6 महिन्यांपूर्वी तरी कुठं माहित होतं की संकट येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. चक्रीवादळ, शेजारी देशांच्या कुरापती अशी अनेक संकटं येत आहेत. या वर्षातील पहिले सहा महिने खराब गेले म्हणून हे संपूर्ण वर्षच वाईट आहे असं समजून चालणार नाही. संकटं वाढल्याने हे वर्ष खराब होऊ शकत नाही. भारताचा इतिहास आहे की आपण संकटांमधून अधिक तेजाने बाहेर पडलो. अनेकांना वाटत होतं की परकीय आक्रमणांनी भारताची संस्कृती संपेल पण भारत नव्या तेजाने समोर आला,” असं मोदी म्हणाले.

‘ये कलकल छलछल बहती क्या कहती गंगा धारा, युगयुग बहता आता यह पुण्य हमारा’

“ये कलकल छलछल बहती क्या कहती गंगा धारा, युगयुग बहता आता यह पुण्य हमारा” असं म्हणत मोदींनी भारताच्या संकटांशी लढण्याच्या परंपरांची आठवण करुन दिली. ते म्हणाले, “भारतात एकामागोमाग संकटं येत गेली, मात्र, त्यातही नवे शोध लागले, नवं साहित्य आलं. म्हणजेच संकटाच्या काळात देखील नवनिर्मितीची प्रक्रिया चालू राहिली. देश पुढेच जात राहिला. भारताने नेहमीच संकटांना यशाची पायरी केलं. याहीवेळी आपल्याला या संकटाला यशाच्या पायरीत रुपांतरीत करायचं आहे. असं झालं तर नवे लक्ष्य प्राप्त करुन आपला देश पुढे जाईल.”

‘खाण, अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत अनेक वर्षांपासून लॉकडाऊन’

“माझा 130 कोटी देशवासीयांवर पूर्ण विश्वास आहे. संकट कितीही मोठं असलं तरी भारत निस्वार्थ सेवेचा संदेश देतो. भारताने जगभरात जी मदत केली त्यामुळे भारताच्या जागतिक बंधुत्त्वाची भावना अधोरेखित झाली. अनलॉकच्या काळात भारत इतर अनेक क्षेत्रांमध्ये देखील अनलॉक होत आहे. खाण, अवकाश तंत्रज्ञान या क्षेत्रात भारत अनेक वर्षांपासून लॉकडाऊनमध्ये होता. आता घेतलेल्या निर्णयाने हे क्षेत्रं अनलॉक झाले आहेत. शेती क्षेत्रही यातील एक आहे. शेतकऱ्यांना कर्जवाटप केले जात आहे. त्यांना हवेतेथे आपले अन्नधान्य विकता येणार आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.

“अरुणाचल प्रदेशमध्ये सियाम जिल्ह्यात एक असं कार्य करुन दाखवलं जे भारतासाठी आदर्श आहे. त्या गावातील अनेक लोकं बाहेर नोकरी करत आहेत. ते घरी येत असल्याचं आल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ गावाबाहेर क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केली. त्यांनी त्या ठिकाणी काही झोपड्या बनवल्या आणि इतर सुविधाही दिल्या. त्यामुळे या गावाच्या कामाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.”

‘कोरोनाने आपल्या दैनंदिन जगण्यात बदल केला’

मोदी म्हणाले, “आपल्या देशातील जे कष्टकरी आहेत त्यांच्या अनेक कहान्या येत आहेत त्या देशाला उर्जा देत आहेत. उत्तर प्रदेशात कल्याणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी काम केलं. असे अनेक उदाहरणं आहेत जी आपल्यापर्यंत पोहचली नाहीत. तुमच्या आजूबाजूला देखील अशा घटना घडल्या असतील. तुम्ही या गोष्टी मला नक्की सांगा. संकटाच्या काळात या गोष्टी इतरांना नक्कीच प्रेरणा देतील. कोरोनाने आपल्या दैनंदिन जगण्यात बदल केला आहे.”

“संपूर्ण जगाचं लक्ष सध्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर आहे. त्यासाठी त्यांचं लक्ष आपल्या देशातील आलं, हळद अशा गोष्टींवर आहे. त्यामुळे आपल्याला जगाला या गोष्टींचं महत्त्व सोप्या भाषेत सांगावं लागेल. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक तणावात गेले, तर अनेकांनी या काळात अनेक छोटेछोटे आनंद घेतले. भारतात छोटेछोटे खेळ आहेत जे या काळात आनंद देऊन गेले”, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

LIVE : पंतप्रधानांची ‘मन की बात’ लाईव्ह

मुंबईकरांना दिलासा, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला, कोणत्या भागात किती?

1962 मध्येही भारताचा भूभाग गेला, ही राजकारणाची वेळ नाही, पवारांचा काँग्रेसला टोला?

PM Modi on India China Face off Mann ki Baat

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *