“भारतीयांचे रक्त खवळलंय, कठोर प्रत्युत्तर देणार…” पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "मन की बात" मध्ये त्यांनी हल्ल्याचा निषेध करून पीडित कुटुंबांना न्याय मिळेल असे आश्वस्त केले.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला कडक शब्दात इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२१ व्या भागात त्यांनी पहलगाम हल्ला आणि त्यानतंर भारताकडून उचलली जाणारी पावलं याबद्दल भाष्य केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय देणार असल्याचे सांगितले.
प्रत्येक भारतीयांचे रक्त खवळले
“आज जेव्हा मी तुमच्याशी मन की बातमध्ये बोलत आहे, तेव्हा माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुःख झाले. या दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयांचे रक्त खवळले आहे, याची मला कल्पना आहे. दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात देशाची एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे”, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
…म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला
“या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला अधिक दृढ निर्धार करावा लागेल. काश्मीरमध्ये शांतता परतत होती. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य येत होते. बांधकाम कामांना अभूतपूर्व गती मिळाली होती. लोकशाही मजबूत होत होती. पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती. लोकांचे उत्पन्न वाढत होते. तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. पण हेच देशाच्या शत्रूंना आणि जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना आवडले नाही. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करायचे आहे. म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. देशासमोरील या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपला संकल्प बळकट करायचा आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत
“दहशतवादी आणि त्यांचे म्होरके हे काश्मीरला उद्ध्वस्त करू इच्छितात. त्यामुळेच त्यांनी एवढा मोठा कट रचला. पहलगाम हल्ला हा दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांच्या निराशेचे प्रतीक आहे. काश्मीर शांतता प्रस्थापित होत होती. आता कुठे काश्मीर पूर्वपदावर येत होते, परंतु दहशतवाद्यांना ते पचलं नाही. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे भारताच्या परंपरा आणि मूल्यांना सामावून घेते. संकटात जगाचा मित्र म्हणून भारताची हे मानवतावादाच्या प्रति बांधिलकीचे प्रतीक आहे. मी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याची निंदा केली. त्यांनी मला फोनवर, पत्र पाठवत आणि संदेश देत या लढाईत भारतासोबत असल्याचे सांगितले”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.
कठोर प्रत्युत्तर दिले जाणार
“मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना खात्री देतो की त्यांना नक्कीच न्याय मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले जाईल”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
