पंजाबमध्ये बसपा-अकाली दलाच्या आघाडीचं राजकीय गणित काय?; कुणाला बसणार धक्का, वाचा सविस्तर

तब्बल 25 वर्षानंतर शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीची (BSP and SAD alliance) पंजाब विधानसभेसाठी आघाडी झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपचे धाबे दणाणले आहेत.

पंजाबमध्ये बसपा-अकाली दलाच्या आघाडीचं राजकीय गणित काय?; कुणाला बसणार धक्का, वाचा सविस्तर
sukhbir singh badal

चंदीगड: तब्बल 25 वर्षानंतर शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीची पंजाब विधानसभेसाठी आघाडी झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपचे धाबे दणाणले आहेत. या नव्या समीकरणामुळे राज्याचं राजकीय गणितच बदलून जाणार असून त्याचा काँग्रेससह भाजपलाही मोठा फटका बसणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Punjab Assembly: 25 years on, SAD, BSP join hands again, say will form next govt)

राज्यातील विधानसभेच्या एकूण 117 जागांसाठी पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. अकाली दलाने भाजपची साथ सोडल्यानंतर बसपासोबत आघाडी करून विधानसभा निवडणूक लढवत असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच या दोन्ही पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला असून बसपा 20 तर अकाली दल 97 जागांवर निवडणुका लढवणार आहे.

33 टक्के दलित व्होट बँकेवर नजर

पंजाबमध्ये 33 टक्के दलित व्होट आहेत. अकाली दलांची नजर या मतांवर आहे. या आघाडीत बसपाला सर्वाधिक दलित बहुल मतदारसंघच सोडण्यात आले आहेत. करतारपूर, जालंधर वेस्ट, जालंधर नॉर्थ, फगवाडा, होशियारपूर शहरी, टांडा, दसूहा, चमकौर साहिब, लुधियाना नॉर्थ आदी जागा बसपाच्या वाट्याला आल्या आहेत.

25 वर्षापूर्वी 11 जागा जिंकल्या

यापूर्वी 1996मध्ये म्हणजे 25 वर्षापूर्वी अकाली दल आणि बसपाची आघाडी झाली होती. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीने 13 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. यात बसपाला तीन तर अकाली दलाला 10 पैकी 8 जागांवर विजय मिळाला होता. आता 25 वर्षानंतर या दोन्ही पक्षांचा राज्यातील जनाधार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष काँग्रेसला धक्का देऊ शकतात, असं सांगितलं जात आहे.

अकाली-बसपाची सत्ता येणार?

दरम्यान, बसपाचे राष्ट्रीय महासचिव सतीश मिश्रा यांनी राज्यात अकाली दल आणि बसपाचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. मात्र, या नव्या आघाडीवर काँग्रेसचे खासदार जसवीर डिंपा यांनी टीका केली आहे. ही आघाडी म्हणजे बुडत्याला काडीचा आधार अशीच आहे. अकाली दल पंजाबमध्ये उरलेला नाही. त्यामुळे बसापाच्या मदतीने पुन्हा कमबॅक करू असं त्यांना वाटत आहे. मात्र, हे त्यांचं दिवास्वप्नच राहील, अशी टीका जसवीर यांनी केली आहे.

आघाडी यशस्वी होणार नाही

या नव्या आघाडीवर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनोरंजन कालिया यांनीही टीका केली आहे. ही आघाडी यशस्वी होणार नाही. बसपाला 20 जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, अकाली दलाची मते बसपाला मिळतील याची काही शाश्वती नाही. अकाली दल हा संधीसाधू पक्ष आहे. आधी त्यांनी भाजपशी हात मिळवणी करून विजय मिळवला. आता बसपासोबत आघाडी करून तिच खेळी खेळण्याचं काम सुरू केलं आहे, असं कालिया म्हणाले.

काँग्रेस-भाजपला धक्का

राज्यात काँग्रेस अंतर्गत दोन गट पडले आहेत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात विस्तवही जात नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला या पक्षांतर्गत वादाचा फटका बसू शकतो. तर, अकाली दलाने साथ सोडल्याने भाजप एकटा पडला आहे. भाजपला स्वबळावर निवडणुका लढाव्या लागणार आहेत. त्यामुळे भाजपला मोठं नुकसान होऊ शकतं. तर आम आदमी पार्टीला अजूनही मित्र पक्ष मिळालेला नसल्याने ते स्वबळावर फार मोठी मजल मारू शकणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर बसपा आणि अकाली दलाच्या आघाडीचा सर्वाधिक फटका काँग्रेस आणि त्यानंतर भाजपला बसण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत. (Punjab Assembly: 25 years on, SAD, BSP join hands again, say will form next govt)

 

संबंधित बातम्या:

अकाली दल आणि बसपाची आघाडी, 25 वर्षानंतर एकत्र; पंजाबमध्ये काँग्रेसच्या सत्तेला मोठं आव्हान!

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली?; जेडीयू, अपना दलची कॅबिनेटमध्ये समावेशाची शक्यता

प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही; पण भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार: नवाब मलिक

(Punjab Assembly: 25 years on, SAD, BSP join hands again, say will form next govt)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI