देशाच्या सर्वांगीण विकासात आरएसएसची महत्त्वाची भूमिका – महेंद्रपाल सिंह ढिल्लन
आज विजयादशमीनिमित्त संघाचा दसरा मेळावा पार पडला, आजपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात झाली आहे, यानिमित्त तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिबचे धर्म प्रचार समिती अध्यक्ष महेंद्रपाल सिंह ढिल्लन यांनी संघाचं कौतुक करताना समाजाप्रति संघाचं असलेलं योगदान अधोरेखित केलं आहे.

आज विजयादशमीनिमित्त संघाचा दसरा मेळावा पार पडला, आजपासून संघाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात झाली आहे, यानिमित्त तख्त श्री हरिमंदिर जी पटना साहिबचे धर्म प्रचार समिती अध्यक्ष महेंद्रपाल सिंह ढिल्लन यांनी संघाचं कौतुक करताना समाजाप्रति संघाचं असलेलं योगदान अधोरेखित केलं आहे.
नेमकं काय म्हणाले महेंद्रपाल सिंह ढिल्लन?
जगातील सर्वात मोठ्या संघटनेला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत, ही खूप आनंदाची बाब आहे. निःस्वार्थ राष्ट्रसेवेच्या भावनेने, या संघटनेने अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत. “माझे शरीर, माझे मन आणि हे जीवन समाजासाठी समर्पित आहे” या भावनेने भारलेल्या, स्वयंसेवकांनी देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्यक्ती श्रेष्ठ नाही तर विचार श्रेष्ठ आहेत. या भावनेने, संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी भारताची शाश्वत पवित्र ओळख असलेल्या भगव्या ध्वजाला आपले गुरु म्हणून स्वीकारले.
भारताच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून आलेल्या लाखो हिंदू आणि शीख समुदायांच्या लोकांची काळजी घेणे, त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करणे, 1962 च्या चीनशी झालेल्या युद्धात देशाचे अंतर्गत व्यवहार सांभाळणे, यासोबतच भूकंप, पूर आणि जेव्हा -जेव्हा मानवावर नौसर्गिक आपत्ती येईल, त्या -त्या काळात संघाचे स्वयंसेवक नेहमीच मदतीसाठी धावून आले आहेत. स्वयंसेवकांनी आपलं जीवन मानवतेसाठी समर्पित केलं आहे.
१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर,जे शीखविरोधी हत्याकांड घडलं, त्यावेळी हजारो शीख कुटुंबांना सुरक्षा आणि संरक्षण देण्यासाठी संघानं पुढाकार घेतला होता. 26 डिसेंबर हा दिवस वीरबाल दिन म्हणून घोषित करणे, करतारपूर कॉरिडॉरचे बांधकाम आणि दिल्ली शीख दंगलीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न हे स्वयंसेवकांच्या दशगुरु परंपरेप्रती असलेल्या अढळ समर्पणाचे परिणाम आहेत. ही जगातील एकमेव संघटना आहे, जिने आपल्या 100 वर्षांच्या प्रवासात कधीही कोणत्याही प्रकारचं विभाजन किंवा वाद अनुभवला नाही. अशा पवित्र संघटनेच्या शताब्दीनिमित्त, संघाचे कार्य अधिक बळकट होवो, संघ वाढत राहो आणि हिंदू, शीख, बौद्ध, जैन, कबीर, नानक व इतर सर्व भारतीय धर्मांमध्ये एकतेचा हा विचार सर्व स्वरूपात विजयी होवो, असं महेंद्रपाल सिंह ढिल्लन यांनी म्हटलं आहे.
