एअर इंडियाच्या विमानात धक्कादायक घटना, एका प्रवाशानं केली दुसऱ्याच्या अंगावर लघवी
दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या विमानामध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाच्या अंगावर लघवी केली आहे.

दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या विमानामध्ये बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एअर इंडियाच्या या फ्लाइटमध्ये एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाच्या अंगावर लघवी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाकडून या घटनेची माहिती डीजीसीएला देण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी सांगितलं की, या घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. चौकशी सुरू असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
फ्लाइटमध्ये नेमकं काय घडलं?
या घटनेबाबत एअर इंडियानं माहिती देताना सांगितलं आहे की, 9 एप्रिल रोजी दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या विमानामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेबाबत संबंधित पीडित प्रवाशानं आमच्या केबिन क्रूला माहिती दिली. त्यानंतर आम्ही सर्व नियमांचं पालन करून यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणात तक्रार करण्यासाठी देखील आम्ही त्याला मदत केली आहे. या प्रकरणात जर संबंधित व्यक्ती दोषी आढळून आला तर त्याच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात येईल. डीजीसीएने ठरवून दिलेल्या नियमांनुसार आम्ही ही कारवाई करू.
तीन वर्षांपूर्वी देखील घडली होती अशीच घटना
दरम्यान दिल्लीहून बँकॉकला जाणाऱ्या या विमानामधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाच्या अंगावर लघवी केली आहे. तीन वर्षांपूर्वी देखील अशीच एक घटना घडली होती. 26 नोव्हेंबर 2022 रोजी ही घटना घडली होती. एयर इंडियाचं फ्लाइट (AI-102) न्यूयॉर्कवरून दिल्लीला येत होतं. बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या शंकर मिश्रा नावाच्या एका प्रवाशानं एका वृद्ध महिलेच्या अंगावर लघवी केली होती. ही घटना तेव्हा चर्चेमध्ये आली, जेव्हा ही घटना घडल्याच्यानंतर एक महिन्याने या वृद्ध महिलेनं डीजीसीएकडे तक्रार केली होती.
या महिलेच्या तक्रारीनंतर जानेवारी 2023 ला शंकर मिश्राला अटक करण्यात आली होती, तसेच या प्रकरणात डीजीसीएने हालगर्जीपणाचा ठपका ठेवत एअर इंडियाला देखील दंड ठोठावला होता. त्यामुळे आता या प्रकरणात एअर इंडियाकडून या घटनेची माहिती डीजीसीएला आधीच देण्यात आली आहे, तसेच डीजीसीएनं ठरवून दिलेल्या नियमांनुसार पुढील कारवाई होईल असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
