विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्राला पत्र लिहून विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवून त्यांच्या मागण्यांवर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्ज आणि राजकीय नेत्यांच्या अटकेनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, वांगचुक यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषणही सुरू ठेवले आहे.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र
Sonam Wangchuk
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 5:51 PM

गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. काल राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही ताब्यात घेतल्याने वातावरण अधिकच तापलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका, मागण्यांवर संसदेत चर्चा करा, असं आवाहन करणारं पत्र लिहिलं आहे.

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गुरुग्रामच्या मेंदाता रुग्णालयात उपचार घेत आहेत. वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांना चिठ्ठी लिहिली आहे. मुलांवर कारवाई करू नका. तुम्ही त्यांच्या मागण्यांवर चर्चा करा. जर तुम्ही हमी देत असाल तर मी उपोषणही सोडायला तयार आहे, असं वांगचुक यांनी या पत्रात म्हटलं आहे. वांगचुक यांच्या या चिठ्ठीवर आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संसदेत सार्थक चर्चा कराव्यात त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा विचार करावा, असंही वांगचुक यांनी या पत्रात म्हटलं आहे.

उपोषणाचं हत्यार

पोलिसांनी वांगचुक यांचं उपोषण जबरदस्तीने मोडीत काढत त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. पण वांगचुक यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मात्र, आता थोडी लवचिक भूमिका घेतल्याने सरकार आता त्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दीपकेंचं आवाहन

दरम्यान, अभिजीत दीपके यांनीही वांगचुक यांना उपोषण सोडण्याचं आवाहन केलं आहे. देशाला तुमची गरज आहे. तुम्ही उपोषण सोडा. आपलं आंदोलन शांततेत सुरू राहील, असं दीपके यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जंतरमंतरवर अजूनही आंदोलक आहेत. मात्र, जंतरमंतरवरील वातावरण शांत आहे. आज आंदोलनाचा 33 वा दिवस आहे. सकाळपासूनच हजारो तरुण जंतरमंतरवर आहेत. पुन्हा एकदा दिल्लीत वातावरण पेटू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीत 16 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. तसेच या परिसरात पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे दुपारपासून जंतरमंतरवर कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाहीये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us