चीनची लस फेल ठरल्यानंतर ब्राझीलची मदतीसाठी भारताकडे धाव; लशीच्या कुप्या घेण्यासाठी विमानच पाठवलं

ब्राझीलला या लशीची इतकी निकड आहे की, केंद्र सरकारने कोणतीही परवानगी देण्यापूर्वीच ब्राझीलचे विमान भारतात दाखल होणार आहे. | Covid 19 vaccine doses

चीनची लस फेल ठरल्यानंतर ब्राझीलची मदतीसाठी भारताकडे धाव; लशीच्या कुप्या घेण्यासाठी विमानच पाठवलं

नवी दिल्ली: कोरोनाच्या देशव्यापी लसीकरणाला (Vaccination) अवघे काही तास उरले असतानाच आता ब्राझीलने भारताकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. ब्राझीलमध्ये यापूर्वीच लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, चिनी बनावटीची सिनोव्हॅक (Sinovac) लशीची परिणामकारकता खूपच कमी असल्याने ब्राझीलच्या अडचणी पुन्हा वाढल्या होत्या. त्यामुळे आता ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून मदतीची याचना केली आहे. (Special flight from Brazil for 2 million Covid 19 vaccine doses)

ब्राझीलला या लशीची इतकी निकड आहे की, केंद्र सरकारने कोणतीही परवानगी देण्यापूर्वीच ब्राझीलचे विमान भारतात दाखल होणार आहे. ब्राझीलला 20 लाख लसींची गरज आहे. त्यासाठी या विमानात विशेष कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्राझीलने काय म्हटले?

ब्राझीलच्या परराष्ट्रमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार अजुल एअरलाईन्सचे ए 330 नियो हे विमान भारतात दाखल होणार आहे. उणे तापमानात लसींची वाहतूक करण्यासाठी या विमानात विशेष कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने कोरोना लसीच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी आता सीरम इन्स्टिट्यूट आणि ब्राझील सरकारमध्ये एक करार झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार ‘सीरम’कडून ब्राझीलला कोव्हिशील्ड लसीचे 20 लाख डोस पुरवले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, ब्राझील सरकार भारत बायोटेककडूनही ‘कोव्हॅक्सीन’ लसीच्या काही कुप्या खरेदी करणार असल्याची माहिती आहे.

कोरोना लसीच्या निर्यातीवर निर्बंध असतानाही ब्राझीलला मदत का?

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सीरम इन्स्टि्यूटच्या कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारताची लसींची गरज पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहणार होती. मग आता अचानक ब्राझीलला लसी का दिल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. भारताने गरजेपेक्षा अधिक लसींचा साठा करुन ठेवण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे उर्वरित लसींची निर्यात केली तरी त्यामुळे भारताच्या लसीकरण कार्यक्रमाला कोणताही फटका बसणार नाही.

ब्राझीलला यापूर्वीही भारताची मदत

एप्रिल महिन्यात कोरोनाची साथ शिखरावर असतानाही भारताकडून ब्राझीलला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (Hydroxychloroquin) या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यावेळी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला हनुमानाची उपमा दिली होती. ज्याप्रमाणे लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर हनुमान संजीवनी वनस्पती घेऊन आला, त्याप्रमाणेच भारत ब्राझीलच्या मदतीला धावून आल्याचे जेअर बोल्सानारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.

संबंधित बातम्या:

‘या’ लोकांना लस मिळणार नाही; राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

CORONA VACCINE | कोरोनाची लस तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार?

केंद्राचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लस तूर्तास भारतीयांनाच, निर्यातीवर बंदी

(Special flight from Brazil for 2 million Covid 19 vaccine doses)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI