Tahawwur Hussain Rana: तहव्वूर राणासाठी खास विमान, भाड्याने घेतलेल्या विमानाचा खर्च शंभर पट जास्त, सुविधाही आलिशान
Tahawwur Hussain Rana: तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात कडक सुरक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत की हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम यांनाही अशाच पद्धतीने भारतात आणता येईल का? परंतु सध्या हा एक काल्पनिक विचार आहे. कारण...

Tahawwur Hussain Rana: मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले. नवी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने त्याला 18 दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे. आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) त्याची कसून चौकशी करणार आहे. 2008 मधील मुंबई हल्ल्याच्या कट कसा रचला, त्याची माहिती घेणार आहे. आरोपीला अमेरिकेतून भारतात आणणे जितके संवेदनशील होते, तितके महागही होते. त्याला भारतात आणण्यासाठी विशेष लग्झरी विमान (चार्टर प्लेन) Gulf Stream G-550 चा वापर करण्यात आला. त्या विमानाचा एका तासाचा खर्च नऊ लाख रुपये होता.
चार्टर विमान व्हिएना येथील एका एअरक्रॉफ्ट कंपनीकडून भाड्याने घेण्यात आला होता. बुधवारी पहाटे 2:15 वाजता हे विमान मियामीवरुन रवाना झाले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता रोमानियाची राजधानी बुखारेस्टमध्ये पोहचले. त्या ठिकाणी 11 तासांचा ब्रेक घेतल्यानंतर गुरुवार सकाळी 6:15 वाजता विमान पुन्हा दिल्लीकडे निघाले. दिल्लीत संध्याकाळी 6:22 वाजता दाखल झाले.
100 पट जास्त पैसे खर्च
विमान सुमारे 40 तासांनंतर ते दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले. या संपूर्ण प्रवासासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. सामान्य परिस्थितीत मियामी ते दिल्ली या बिझनेस क्लासच्या तिकिटाची किंमत सुमारे 4 लाख रुपये असते. म्हणजेच मुंबई हल्ल्यातील या आरोपीला भारतात आणण्यासाठी सरकारने जवळजवळ 100 पट जास्त पैसे खर्च केले. आता प्रश्न हा उरतो की राणा याला भारतात आणण्यासाठी एवढी मोठी रक्कम का खर्च करण्यात आली? त्याचे उत्तर आहे सुरक्षा. प्रत्यक्षात तहव्वूर राणा हा एक हाय-प्रोफाइल दहशतवादी आहे. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांच्या सुरक्षा एजन्सींनी त्याच्या प्रत्यार्पणाबाबत विशेष खबरदारी घेतली. यामुळे चार्टर विमान हा एकमेव सुरक्षित पर्याय मानला जातो.




हाफिज सईद, दाऊद इब्राहिम येणार का?
तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात कडक सुरक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत की हाफिज सईद आणि दाऊद इब्राहिम यांनाही अशाच पद्धतीने भारतात आणता येईल का? परंतु सध्या हा एक काल्पनिक विचार आहे. कारण भारताचा पाकिस्तानसोबत प्रत्यार्पण करार नाही. तसेच पाकिस्तान सरकारच त्या दहशतवाद्यांना संरक्षण देत आहे.
कसे आहे ते चार्टर विमा
Gulf Stream G-550 हे विमान 2013 मध्ये निर्माण केले गेले. ते अल्ट्रा लाँग रेंज मिड-साईज श्रेणीमध्ये येते. त्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आतील अद्भुत भाग आहे. या विमानाची कमाल क्षमता 19 प्रवाशांची आहे. त्यात 9 दिवान सीट्स आहेत. त्या सीट झोपण्यासाठी बेडप्रमाणे करता येतात. त्यात 6 बेड देखील आहेत. या विमानात उड्डाणादरम्यान वायरलेस इंटरनेट, सॅटेलाइट फोन आणि आधुनिक मनोरंजन प्रणाली आहे. त्याच्या अंडाकृती खिडक्या त्याला एक वेगळी ओळख देतात आणि व्हीआयपी भेटींसाठी ते पसंतीचे पर्याय मानले जाते.