Jyoti Malhotra : गद्दारी करणाऱ्या ज्योतीसोबत जोडलं गेलं पुरीच्या यूट्यूबरचं नावं, ओदिशाच्या मंत्र्यांचा कठोर इशारा
जर पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणात राज्यातील कोणाचाही संबंध आढळला तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ओडिशाच्या कायदा मंत्र्यांनी दिला. हेरगिरी केल्याचा आरोप असलेली ज्योती मल्होत्रा हिच्या अटकेनंतर, पुरीमधील एका युट्यूबरच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे.तिचे ज्योति मल्होत्राशी काय संबंध होते, त्या दोघींचा संपर्क कसा झाला याचाही तपास सुरू आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या हिसारमधील ज्योती मल्होत्रा हिला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली. अनेकवेळा केलेली पाकिस्तान वारी, तेथील विविध उच्च अधिकाऱ्यांशी असलेला संपर्क या सगळ्यांमुळे ज्योतीचा पाय खोलात जात असून आता या प्रकरणात नवा ट्विस्टही आलाय. ज्योतीसोबतच आणखी एक यूट्यूबर प्रियांका सेनापतीचं नावही समोर आलं होतं. मूळची पुरी येथील असलेली प्रियांका ही ज्योतीच्या संपर्कात आल्याने, तिचीही कसून चौकशी होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ओदिशातील कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी कडक इशारा दिलाय. पाकिस्तानला संवेदनशील माहिती लीक करण्यात जर कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळला तर त्याच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितलं.
पुरीच्या YouTuber चा ज्योतीशी संपर्क कसा ?
युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर तिच्या ओडिशा कनेक्शनची चौकशी तपास संस्थांकडून करण्यात आल्यावर ओदिशाच्या कायदे मंत्र्यांनी हे विधान केलं आहे. भारतात राहन, इकडचंच मीठ खाऊनही हरियाणातील ज्योति मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी करत तेथील गुप्तचर संस्थेला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप असून त्याप्रकरणीची तिला ज्योतीला अटक करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर ज्योतीने पुरीमधील जगन्नाथ मंदिर, कोणार्क आणि चिल्का सारख्या ठिकाणी भेट दिली होती आणि ती पुरीतील एका युट्यूबरच्या संपर्कात होती, असेही म्हटले जाते.
NIA कडून तपास
‘ही बाब अतिशय गंभीर आहे आणि राष्ट्रीय तपास संस्था (NIA) त्याची चौकशी करत आहे. जर ओडिशातील कोणताही रहिवासी यामध्ये सहभागी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. ती व्यक्ती हेरगिरीत थेट सहभागी असो किंवा अप्रत्यक्षपणे मदत करत असो, त्याला सोडणार नाही’ असा इशाराच मंत्री हरिचंदन यांनी दिला. .
‘ज्योती मल्होत्रा पुरी येथील एका युट्यूबरच्या संपर्कात होती हे आम्हाला कळले आहे, परंतु अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. वस्तुस्थिती तपासली जात आहे.’ असे ओडिशा गुन्हे शाखेचे आयजीपी सार्थक सारंगी म्हणाले.
पुरीच्या यूट्यूबरचे स्पष्टीकरण
‘मी ज्योतीशी फक्त युट्यूबवरून मैत्री केली. ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत आहे हे मला माहित नव्हते.’ असे पुरीच्या महिला युट्यूबरने सोशल मीडियावर स्पष्ट केलं. जर मला कोणत्याही तपास संस्थेच्या चौकशीला सामोरे जावे लागले तर मी पूर्ण सहकार्य करेन. देश सर्वोच्च आहे. जय हिंद.’ असेह तिने नमूद केलं.
या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू असून आणि एनआयए प्रत्येक पैलूचा गांभीर्याने तपास करत आहे. देशद्रोहाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही सौम्यता दाखवली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.