Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमध्ये कर्नल, मेजर आणि DSP शहीद, मन हेलावणारी घटना
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आज भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन बडे अधिकारी शहीद झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जम्मू-काश्मीर हादरलं आहे.
श्रीनगर | 13 सप्टेंबर 2023 : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने सुरुच आहेत. या दहशतवाद्यांनी प्रचंड हैदोस माजवला आहे. या दहशतवाद्यांमुळे आज भारतीय सैन्यातील दोन अधिकारी आणि जम्मू काश्मीर पोलिसातील DSP (पोलीस उपअधिक्षक) शहीद झाले आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी या तीनही जणांनी स्वत:च्या प्राणाची आहुती दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जम्मू-काश्मीर हळहळलं आहे. जम्मू काश्मीरच्या अनेक नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केलाय.
संबंधित घटना ही जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग या परिसरात घडलीय. सुरक्षा यंत्रणांना आज सकाळी महत्त्वाची माहिती मिळाली होती. एक दहशतवादी आज एकेठिकाणी वावरत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या विरोधात शोध मोहिम सुरु केली.
तीन मोठे अधिकारी शहीद
भारतीय सैन्याचे कर्नल मनप्रीत सिंह यांच्या नेतृत्वातील लष्कराच्या पथकाने दहशतवाद्यांवर हल्ला सुरु केला. यावेळी अतिरेक्यांनीदेखील त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात मनप्रीत सिंह यांचा मृत्यू झाला. या चकमकीत मनप्रीत यांच्यासह मेजर आशिष धोनैक आणि जम्मू काश्मीर पोलिसातील डीएसपी हुमांयू भट शहीद झाले.
हुमांशू यांना दोन महिन्यांची लहान मुलगी आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे. तसेच ते जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महानिरीक्षक गुलाम हसन भट यांचे चिरंजीव आहेत. भट यांच्या शरीरातून जास्त रक्त वाहून गेल्यामुळे त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकलं नाही, अशी माहिती समोर येत आहे.
कर्नल मनप्रीत सिंह यांचा जागीच मृत्यू
दहशतवादी हे एका उंच टेकड्यावर होते. पोलीस, भारतीय सैन्य तिथे पोहोचलं होतं. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली होती. पोलीस आणि जवान टेकड्यावर चढू लागले तेव्हा अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबारात कर्नल मनप्रीत सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. तर मेजर आशिष धोनैक आणि डीएसपी हुमांयू भट हे गंभीर जखमी झाले.
दोन्ही जखमी अधिकाऱ्यांना सैन्याच्या विशेष हेलिकॉप्टरने श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भारताच्या या तीन वीरपुत्रांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे दहशतवादी हे लश्कर-टीआरएफ ग्रुपचे होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.