चंद्राबाबूंना धक्का, टीडीपीच्या चार खासदारांचा भाजपात प्रवेश

चंद्राबाबूंनी एनडीएसोबत फारकत घेतल्यानंतर भाजपविरोधात मोर्चा उघडला होता. पण विधानसभा आणि लोकसभेत एकदाच दारुण पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर आता पक्षातील खासदारांनीही साथ सोडली आहे.

चंद्राबाबूंना धक्का, टीडीपीच्या चार खासदारांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली : टीडीपीने आंध्र प्रदेशातली सत्ता गमावल्यानंतर पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. राज्यसभेतील चार खासदारांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. राज्यसभेत टीडीपीचे सहा खासदार होते, त्यापैकी चार जणांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय. चंद्राबाबूंनी एनडीएसोबत फारकत घेतल्यानंतर भाजपविरोधात मोर्चा उघडला होता. पण विधानसभा आणि लोकसभेत एकदाच दारुण पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर आता पक्षातील खासदारांनीही साथ सोडली आहे.

भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत तीन खासदारांनी अधिकृतपणे प्रवेश केला, तर एका खासदाराची प्रकृती खराब असल्यामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहता आलं नाही. भाजपात प्रवेश करणाऱ्या खासदारांमध्ये टीडी व्यंकटेश, सीएम रमेश, वायएस चौधरी आणि जीएम राव यांचा समावेश आहे.

या खासदारांची गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात येण्याची इच्छा होती, असं जेपी नड्डा म्हणाले. गुरुवारी या खासदारांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांना पत्र लिहून विलिनीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर खासदारांनी भाजपचं पत्र घेऊन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. त्यामुळे हे चारही खासदार आता भाजपचे सदस्य आहेत. या चार खासदारांमुळे आंध्र प्रदेशात भाजपचा जनाधार वाढेल, असं जेपी नड्डा म्हणाले.

दरम्यान, संकट हे आमच्या पक्षासाठी नवीन नसल्याचं चंद्राबाबूंनी म्हटलंय. आम्ही भाजपसोबत विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लढा दिला. याचसाठी आमच्या खासदारांनी केंद्रातलं मंत्रिपदही सोडलं. भाजपने आमचा पक्ष कमकुवत करण्याचा जो प्रयत्न चालवलाय, त्याचा आम्ही निषेध करतो. संकट आपल्या पक्षासाठी नवीन नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये, असंही ते म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *