यूएईतील डॉक्टरकडून एअर इंडिया दुर्घटनेतील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटींची मदत
यूएईस्थित डॉक्टर आणि समाजसेवक डॉ. शामशीर वायलिल यांनी अहमदाबादमधील एअर इंडिया फ्लाइट १७१ च्या दुर्घटनेत प्रभावित झालेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे व डॉक्टरांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत ₹6 कोटींचे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे.

Ahmedabad Plane Crash : यूएईस्थित डॉक्टर आणि समाजसेवक डॉ. शामशीर वायलिल यांनी अहमदाबादमधील एअर इंडिया फ्लाइट १७१ च्या दुर्घटनेत प्रभावित झालेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचे व डॉक्टरांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत ₹6 कोटींचे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजवर ही दुर्घटना झाल्यामुळे त्यांच्या वैद्यकीय वसतिगृहातील जुन्या आठवणी पुन्हा उजळल्या व त्यांनी ही मदत अत्यंत व्यक्तिगत भावनेतून दिली आहे.
१२ जून रोजी, एका बोईंग ७८७ विमानाने बी.जे. मेडिकल कॉलेजच्या अतुल्यम वसतिगृह व मेस ब्लॉकवर धडक दिली. या दुर्घटनेत चार वैद्यकीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण जखमी, तसेच कॅम्पसमध्ये राहत असलेल्या डॉक्टरांच्या पाच कुटुंबीयांचाही मृत्यू झाला. जेवणाच्या वेळेस विमान वसतिगृहावर आदळल्याने विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची जागा मातीमोल झाली. वाचलेल्यांनी सांगितले की पुस्तकं, वस्तू व अन्नपात्रं सगळं अस्ताव्यस्त झालं होतं.
या दुर्घटनेत मृत्यू पावलेले एमबीबीएस विद्यार्थी:
जयप्रकाश चौधरी – बाडमेर, राजस्थान
मानव भादू – श्रीगंगानगर, राजस्थान
आर्यन राजपूत – ग्वाल्हेर, मध्यप्रदेश
राकेश दियोरा – भावनगर, गुजरात
हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर होते, त्यांचे आयुष्य भरपूर आशावाद व सेवाभावाने भरलेले होते. अबूधाबीमधून ही मदत जाहीर करताना, बुर्जील होल्डिंग्सचे संस्थापक व चेअरमन आणि व्हीपीएस हेल्थचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. शामशीर वायलिल यांनी सांगितले की, ही दृश्ये पाहून ते हेलावले. ते स्वतः एकेकाळी कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मंगळुरू व श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज, चेन्नई येथे वसतिगृहात राहत होते, म्हणून ही घटना त्यांना अत्यंत जवळची वाटली.
“मी मेस व वसतिगृहाचे फुटेज पाहिले आणि खूप हादरलो. ही ठिकाणं कधी काळी माझी घरं होती – ते कॉरिडॉर, ते पलंग, तो अभ्यासाचा तणाव, आणि घरी फोनची वाट पाहणं – या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. कोणालाही कल्पना नसते की एका व्यापारी विमानाचं अशा जगात आगमन होईल,” असे त्यांनी सांगितले.
डॉ. वायलिल यांच्या मदतीचा तपशील पुढीलप्रमाणे:
मृत चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹1 कोटी
गंभीर जखमी पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹20 लाख
डॉक्टरांचे कुटुंबीय ज्यांनी आप्त गमावले, त्यांना प्रत्येकी ₹20 लाख
ही मदत बी.जे. मेडिकल कॉलेजच्या ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशन च्या समन्वयाने दिली जाईल, जेणेकरून गरजूंना लवकर मदत मिळू शकेल.
ही अशी पहिली वेळ नाही की डॉ. शामशीर यांनी संकट काळात मदतीचा हात दिला आहे. २०१० मध्ये मंगळुरू विमान दुर्घटनेनंतर, त्यांनी अनेक प्रभावित कुटुंबांना आर्थिक मदत व नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांच्या मदतीचा व्याप्त भारतातून ते खाडीपर्यंत नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक आरोग्य संकटे व स्थलांतर अशा अनेक प्रसंगांपर्यंत विस्तारलेला आहे.
“हे तरुण माझ्या वैद्यकीय कुटुंबाचा भाग होते. मला माहीत आहे की परीक्षा जवळ आल्या की रात्रभर अभ्यास करणं काय असतं, मेसमध्ये एकत्र जेवणं, थकून परतल्यावर रूममध्ये जाऊन पडणं – हाच आयुष्याचा भाग होता. आणि असं आयुष्य इतक्या क्रूरपणे हिरावून घेतलं गेलं, हे अतिशय वेदनादायक आहे,” असे डॉ. शामशीर यांनी भावुक होत सांगितले.
जखमींपैकी एक, तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी ऋतेश कुमार शर्मा, अनेक तास ढिगाऱ्याखाली अडकलेला होता आणि त्याच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याचे अनेक मित्र देखील जखमी झाले.
डॉ. वायलिल यांनी स्पष्ट केले की ही मदत केवळ आर्थिक नाही, तर वैद्यकीय समुदायाच्या ऐक्याचे प्रतीक आहे. “घडलेली घटना बदलता येणार नाही. हे विद्यार्थी इतरांना सेवा देण्यासाठी तयारी करत होते. त्यांची स्वप्नं आपण विसरू नयेत. ती पूर्ण करणं आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.
बी.जे. मेडिकल कॉलेज अजूनही या धक्क्यातून सावरत आहे. अनेक विद्यार्थी व कुटुंबीय सध्या तात्पुरत्या निवासस्थानी हलवले गेले आहेत. अनेकांनी फक्त निवासच नाही तर सहकारी, सामान आणि सुरक्षिततेची भावनाही गमावली आहे. ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशन स्थानिक प्रशासनासह समन्वय साधून गरजूंना मदत पोहोचवण्याचे कार्य करत आहे. डॉ. शामशीर यांची टीम देखील त्यांच्या सोबत काम करणार आहे, जेणेकरून या मदतीचा खऱ्या गरजूंना लाभ मिळेल.