पाकिस्तानचं कंबरडं मोडलं जाणार? दिल्लीत मोठ्या घडामोडी, आता सर्व राज्यांसोबत बैठक; काय घडतंय?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध चालू होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता युद्धाचे ढग जास्तच गडद झाले आहेत. हीच बाब लक्षात घेता आता भारतभरात 7 मे रोजी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे.

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध चालू होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता युद्धाचे ढग जास्तच गडद झाले आहेत. हीच बाब लक्षात घेता आता भारतभरात 7 मे रोजी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. दरम्यान, एकीकडे युद्धजन्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता आज दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखील वेगवेगळ्या राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण सचिवांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
244 जिल्ह्यांमध्ये होणार मॉक ड्रिल
दिल्लीमध्ये होत असलेल्या या बैठकीकडे सर्वांचंच लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह सचिवांच्या या बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण प्रमुख व्हीसीद्वारे उपस्थित असणार आहेत. देशातील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाच्या तयारीसंदर्भात ही बैठक होत आहे. या बैठकीला एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.
मुख्यमंत्र्यांना दिली जाणार माहिती
दिल्लीतील केंद्रीय गृह सचिवांच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना बैठकीचं ब्रिफिंग दिलं जाणार आहे. मॉकड्रील संदर्भात केंद्रीय गृहविभागाच्यासोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडून हे ब्रिफिंग होणार असल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये मॉक ड्रिलची जोरदार तयारी
येत्या 7 मे रोजी होणाऱ्या मॉक ड्रिलची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नाशिकमध्येही या मॉक ड्रिलची जोरदार तयारी चालू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मॉक ड्रिलसंदर्भात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली आहे. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल व आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ड्रिलसाठी आवश्यक साहित्यांची जमवाजमव सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक उपकरणांपासून मेडिकल सपोर्टपर्यंत तयारी केली जात आहे. रुग्णवाहिका, वायरलेस सिस्टम, आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. प्रशिक्षित पथकांची नियुक्ती करण्यात येत आहे. नागरिकांना घाबरून न जाता सहकार्य करण्याचे आवाहन नाशिकच्या प्रशासनाने केले आहे.
राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग
दरम्यान, मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मॉक ड्रिल का होत आहे?
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे संबंध निर्माण झाले आहेत. कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास लोकांनी काय काळजी घ्यावी, यासाठी ही मॉक ड्रिल घेतली जात आहे. या मॉक ड्रिलदरम्यान शहरात ब्लॅकआऊट केलं जाईल. तसेच नागरिकांनी सुरक्षित स्थळी कसे जावे, यासाठी प्रशिक्षण दिलं जाईल.
