कहानी में ट्विस्ट! ममता दीदींच्या पराभवाच्या राहुल गांधींना गुदगुदल्या; कारण तरी काय? दोन मोर्चांवर काँग्रेसला फायदा कसा?
West Bengal Mamata Banerjee-Rahul Gandhi: ममता बॅनर्जी यांच्या पराभवाने काँग्रेस नेते, खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पक्षासमोरील एक मोठे आव्हान आपोआप दूर झाले. केरळम राज्यानंतर पश्चिम बंगालमध्ये असं काय घडलं?

West Bengal Mamata Banerjee-Rahul Gandhi: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 15 वर्षानंतर ममता बॅनर्जी या सत्तेबाहेर गेल्या. बंगाल निवडणुकीतील अजून काही मतदार संघातील मत मोजणी प्रक्रिया सुरू आहे. भाजप 185 जागांवर पुढे आहे. तर तृणमूल काँग्रेस केवळ 93 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तरीही पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचा पराभव आणि केरळम राज्यात काँग्रेस नेतृत्वातील आघाडीला मिळालेले घवघवीत यश पाहता विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना का गुदगुदल्या होत आहे?
INDIA आघाडीत राहुल गांधींचे पारडे जड
इंडिया आघाडीत राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य करणे घटक पक्षांना जर जडच गेले. त्यात ममता बॅनर्जी या तर काँग्रेसच्या हातून आघाडी हिसकावण्याच्या प्रयत्नात होता. चौथ्यांदा त्या जर मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्या असत्या तर इंडिया आघाडीवर त्यांचा वरचष्मा राहिला असता. तर दुसरे नाव तामिळनाडूतील एमके स्टॅलिन यांचा नंबर होता. या दोन्ही नेत्यांना सत्तेत परतता तर आलेच नाही, त्यांची आमदारकीही वाचवता आली नाही. या दोघांचाही इंडिया आघाडीवर दावा होता. आता हे दोन्ही नेते कमकुवत झाल्याचा अर्थ इंडिया आघाडीत राहुल गांधी यांचे पारडे आता जड झाले आहे. कोणाला पटो वा न पटो भाजपशी ज्याचे वाकडे, त्याला राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य करावेच लागणार आहे.
2024 मधील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला अपेक्षित बहुमत मिळाले नाही. जर काँग्रेसला अजून 40 जागा अधिक मिळाल्या असत्या तर कदाचित पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील निकालच नाही तर आसामध्येही भाजपला काँग्रेसने टफ फाईट दिली असती. पण मनुष्यबळ आणि करिष्माई नेतृत्व या संभ्रमात पक्षाला मोठा पल्ला गाठता आलेला नाही. अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांचा ओढाही ममता बॅनर्जी यांच्याकडेच होता. त्यांचा आक्रमक स्वभाव आणि भाजपविरोधात थेट मैदानावरची लढाईचा बाणा या त्यांच्या जमेची बाजू होती. तर राहुल गांधी यांचे नेमस्त स्वभाव आणि राजकीय दूरदृष्टीचा अभाव असल्याचा आरोप वारंवार होतो. त्याचा फायदा दीदींना होत होता. पण आता त्यांचा पराभव झाल्याने राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य केल्याशिवाय इतर नेत्यांपुडे कोणताही पर्याय शिल्लक उरलेला नाही. राहुल गांधी यांनी केरळममध्ये आघाडीच्या जोरावर सत्ता आणली आहे. डाव्यांची सत्ता उलथवली आहे.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे कमबॅक
केरळ हातात आलेला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यामुळे काँग्रेसची वाढ खुंटली होती. आता तृणमूल काँग्रेसच्या पराभवामुळे पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. काँग्रेसला अनेक महत्त्वाच्या ठिकाणी निवडणूक लढवण्यास ममता बॅनर्जी यांनी विरोध केला होता. अगोदर डाव्या पक्षांचा गड आणि नंतर तृणमूलचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये गेल्या 49 वर्षांपासून काँग्रेसचा वनवास सुरू आहे. आता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये नव्याने संघटन करता येईल आणि पाच वर्षांनी तृणमूलची जागा घेता येईल असा दावा करण्यात येत आहे.