ट्रम्प यांच्यासोबत पाकिस्तानचा लष्करप्रमुख लंच घेत होता, तेव्हा परराष्ट्र मंत्री कुठे होते?; राहुल गांधींचा सवाल
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री काय करत होते असा प्रश्नही गांधी यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर सुरु असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री काय करत होते असा प्रश्नही गांधी यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीन मुनीर आहे. तो ट्रम्पसोबत जेवत होता. ट्रम्प सर्व प्रोटोकॉल तोडून मुनीरचं स्वागत करतात. पंतप्रधान त्यांचा निषेधही नोंदवत नाही असं गांधी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, पहलागामचा मास्टरमाइंड मुनीर ट्रम्पसोबत जेवत होता. तेव्हा भारताचे परराष्ट्रमंत्री काय करत होते? दहशतवाद्यांचा हल्ला झाला तर युद्ध करू असं तुम्ही सांगितलं. तुम्ही दहशतवाद्यांना युद्धासाठीची खुली छूटच दिली. हे काय चाललंय. उद्या दहशतवाद्यांनी हल्ला केला तर तुम्ही काय करणार आहात? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी सरकारला विचारला आहे.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, परराष्ट्रमंत्री म्हणाले, सर्व देशाने टेररिझमचा निषेध नोंदवला. हे 100 टक्के करेक्ट आहे. पण त्यांनी हे सांगितलं नाही की, पहलगाम नंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध नोंदवला नाही. फक्त दहशतवाद्याचा निषेध नोंदवाला. याचा अर्थ जग पाकिस्तानच्या बाजूने आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देताना राहुल गांधींनी म्हटले की, ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितलं की मी सीजफायर केलं. जर पंतप्रधानांमध्ये दम असेल तर त्यांनी सभागृहात सांगावं ट्रम्प खोटं बोलत आहेत. इंदिरा गांधींसारखी धमक दाखवावी. इंदिरा गांधी यांच्या एवढी 25 टक्के दम असेल तर बोलावं. ट्रम्प खोटारडे आहेत हे सांगावं.’
भारतीय परराष्ट्रमंत्रालयासोबत चीन आणि पाकिस्तानमधील युतीते सर्वात मोठे आव्हान आहे. चीन पाकिस्तानला गंभीर माहिती देत होता. जनरल राहुल सिंह म्हणाले आहेत की पाकिस्तानला चीनकडून थेट युद्धभूमीवरील शस्त्रे मिळत होती. पाकिस्तानी अधिकारी चीनमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. हे सध्या धोकादायक आहे. हे देशासाठी धोकादायक आहे.
