विंग कमांडर अभिनंदन यांचा 'वीर चक्र'ने सन्मान होण्याची चिन्हं

पाकिस्तानचं F-16 विमान पाडून पाकशी निकराने लढा देत भारतभूमीवर परतलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा 'वीर चक्र' हे सर्वोच्च तिसरे शौर्य पदक देऊन गौरव केला जाऊ शकतो.

विंग कमांडर अभिनंदन यांचा 'वीर चक्र'ने सन्मान होण्याची चिन्हं

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांना ‘वीर चक्र’ (Veer Chakra) प्रदान करुन केंद्र सरकार गौरव करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरोधात निकराचा लढा देत दाखवलेल्या साहसाबद्दल त्यांना हे पदक बहाल केलं जाऊ शकतं.

पुलवामा हल्ल्यानंतर (Pulwama Attack) पाकिस्तानच्या बालाकोट (Balakot) मधील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय सैन्याने एअर स्ट्राईक (Balakot Airstrike) केला होता. यावेळी निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनंदन यांनी पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं होतं.

अतुलनीय साहसाबद्दल अभिनंदन यांना ‘वीर चक्र’ देऊन सन्मानित केलं जाऊ शकतं. याशिवाय दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बहल्ले करणाऱ्या ‘मिराज 2000 ‘च्या वैमानिकांचाही वायुसेनेचं पदक देऊन गौरव होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्यानंतर त्यांच्या ताब्यात गेलेल्या अभिनंदन यांनी निकराने लढा दिला. अखेर भारताच्या मुत्सद्देगिरीला यश आल्यानंतर अवघ्या 60 तासांत अभिनंदन यांची पाकिस्तानला सुटका करावी लागली. वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन भारतभूमीवर परतले होते.

‘वीर चक्र’ हे पदक युद्धावेळी वीरता दाखवणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या जवानांना प्रदान केलं जातं. असामान्य साहस किंवा बलिदान देणाऱ्या जवानांना हे मानचिन्ह देण्याची परंपरा आहे. ‘परम वीर चक्र’, ‘महा वीर चक्र’ यानंतर ‘वीर चक्र’ हे तिसऱ्या क्रमांकाचं शौर्य पदक आहे.

कारगिल युद्धानंतर (Kargil War 1999) 2000 मध्ये अखेरचं वीर चक्र देण्यात आलं होतं. एकविसाव्या शतकात कोणत्याही जवानाचा ‘वीर चक्र’ने गौरव झालेला नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *