ज्योती मल्होत्राचा कारनामा, बापापासूनही लपवल्या ‘त्या’ गोष्टी, धक्कादायक माहिती उघड!
ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर देशभरातून काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तिच्या वडिलांनी या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

Youtuber Jyoti Malhotra : यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, तिला अटक करण्यात आल्यानंतर देशभरातून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर ज्योती मल्होत्राबाबत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. असे असतानाच ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी तिच्यावर केलेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे मला या सर्व प्रकाराबाबत काहीच माहिती नव्हतं, असं त्यांनी म्हटलंय.
ती कपडे घेऊन निघून गेली…
ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानी अधिकारी तसेच काही पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात होती, असा आरोप आहे. तिने भारताशी संबंधित काही संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे. या सर्व आरोपांनंतर ज्योतीचे वडील हरिश मल्होत्रा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीये. “मला काहीही माहिती नव्हतं. ती मला सांगायची की मी दिल्लीला चालले. तिने कधीच कोणत्या मित्रांना घरी आणलं नाही. काल मात्र आमच्या घरी पोलीस आले. ती कपडे घेऊन निघून गेली. काहीच बोलली नाही. मी नेमकं काय बोलू?” अशी भावूक प्रतिक्रिया हरिश मल्होत्रा यांनी दिली.
तिचा कोणताही मित्र कधीही…
ज्योतीची पाकिस्तान भेट तसेच हेरगिरीचे आरोप यावरही त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. “मला याबाबतही काहीच माहिती नाही. ती काय करते याबाबतही मला माहिती नव्हतं. ती कोणाच्या संपर्कात आहे, याची मला कल्पना नव्हती. ज्योती घरीच व्हिडीओ तयार करायची. आमच्या घरी तिचा कोणताही मित्र कधीही आलेला नाही. तिने कधीच पाकिस्तानला जाण्याबाबत आम्हाला सांगितलं नव्हतं,” असं हरिश मल्होत्रा यांनी सांगितलं.
#WATCH | Hisar, Haryana: Jyoti Malhotra, a resident of Haryana’s Hisar, has been arrested for allegedly sharing sensitive information and being in continuous contact with a Pakistani citizen.
Her father, Harish Malhotra, says, ” I didn’t know, she had told me that she was going… pic.twitter.com/OHuzg33P1S
— ANI (@ANI) May 19, 2025
पोलीस घरात साधारण 15 मिनिटे…
“ज्योतीला पोलीस घेऊन गेले आहेत. तिचा लॅपटॉप तसेच अन्य सामान पोलिसांनी नेलं आहे. पोलीस घरात साधारण 15 मिनिटे होते. ज्योती तिच्यासोबत काही कपडे घेऊन गेली आहे. मी काश्मीर किंवा पाकिस्तानला चालले, असं तिने मला कधीच सांगितलं नाही. मी दिल्लीला जात आहे, एवढंच ती सांगायची. हे सर्व समोर आल्यानंतर मी परेशान आहे. काय करू मला काहीच समजत नाहीये,” असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ज्योतीसोबत अन्य काही लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे हेरगिरीच्या प्रकरणी इतरही गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.