तावडेंचं प्रमोशन, बावनकुळेंना बळ, गडकरींचे हात मजबूत; फडणवीसांचं काय चुकलं?

राज्यातील आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील समन्वय पाहता हे सरकार लवकर कोसळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे भाजपने संघटनात्मक बांधणीवर जोर दिला आहे. त्याचबरोबर पक्षातील जुन्या नेत्यांना बळ देतानाच झालेल्या चुकाही करेक्ट करण्यास सुरुवात केली आहे.

तावडेंचं प्रमोशन, बावनकुळेंना बळ, गडकरींचे हात मजबूत; फडणवीसांचं काय चुकलं?
Devendra fadnavis

मुंबई: राज्यातील आघाडी सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील समन्वय पाहता हे सरकार लवकर कोसळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे भाजपने संघटनात्मक बांधणीवर जोर दिला आहे. त्याचबरोबर पक्षातील जुन्या नेत्यांना बळ देतानाच झालेल्या चुकाही करेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने विनोद तावडे यांना प्रमोशन आणि चंद्रशेखर बावनकुळेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. बावनकुळेंना उमेदवारी दिल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे हात मजबूत झाल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय या खेळीतून भाजप नेतृत्वाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला असल्याची चर्चा आहे.

भाजपने राज्य पातळीवर घेतलेल्या या निर्णयाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीचे हे सूचक संकेत असल्याचंही सांगितलं जात आहे. एवढेच नव्हे तर पक्षात करण्यात आलेल्या या फेरबदलामुळे 2024मध्ये विधानसभा निवडणुकीचं नेतृत्व फडणवीसांकडे राहण्याची शक्यता मावळली आहे. मुख्यमंत्रीपदी असताना फडणवीस यांनी तावडेंना साइडलाईन केलं होतं. तावडे शिक्षण मंत्री होते. त्यानंतर त्यांचा कॅबिनेटचा पोर्टफोलिओ कमी करण्यात आला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांचं तिकीटही कापलं गेलं. त्याचप्रकारे चंद्रशेखर बावनकुळेही ऊर्जा मंत्री होते. नागपूरमधील ओबीसी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींचे समर्थक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. फडणवीसांनी त्यांचंही तिकीट कापलं होतं. त्यामुळे विदर्भात भाजपला सहा जागा गमवाव्या लागल्या.

ती गंभीर चूक होती

विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणुकीत तिकीट न देणं ही पक्षाची गंभीर चूक होती, असं भाजपच्या एका उपाध्यक्षाने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं. शिवसेना आणि भाजपमधील 25 वर्षाची युती तुटण्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचंही भाजप नेतृत्वाला वाटत आहे. पक्षातील आपल्या स्पर्धकांविरोधात फडणवीसांनी शत्रुत्वाची भावना निर्माण केल्याचंही या नेत्यांना वाटतं. कोरोनाच्या संकटात मुंबईतील लोक त्रस्त झाले होते. मात्र, सरकारच्या चुकांच्या विरोधात फडणवीस जनतेचा भरवसा जिंकू शकले नसल्याचंही काही लोकांचं म्हणणं आहे.

गडकरींचे हात मजबूत

तावडे आणि बावनकुळेंना तिकीट न देणं हा धाडसी निर्णय असल्याचं म्हटलं गेलं होतं. परंतु, या दोन्ही नेत्यांना तिकीट नाकारल्याने विधानसभा निवडणुकीवेळी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळेच भाजपला नुकसान सोसावं लागलं. बावनकुळे हे तेली समाजातून येतात. पण विदर्भातील ओबीसींचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. राज्यात आणि देशात जातीय जनगणनेची मागणी होत आहे. अशावेळी भाजपहा जातवर आधारीत जनगणना करण्यास विरोध करत असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. त्यातच बावनकुळे आणि तावडेंचं तिकीट कापल्या गेल्यानं भाजप मराठा आणि ओबीसी विरोधात असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. त्यामुळे त्याचं खापर अपसूकच फडणवीसांवर फोडलं जात असून त्या तुलनेत नितीन गडकरींचे हात अधिक मजबूत होताना दिसत आहेत.

फडणवीस काय म्हणाले?

तावडेंना प्रमोशन मिळाल्यानंतर फडणवीसांनी अत्यंत तोलूनमापून प्रतिक्रिया दिली होती. तावडेंना राष्ट्रीय महासचिव केल्याबद्दल मी खूश आहे. ही एक महत्त्वाची भूमिका आहे. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनीही ही जबाबदारी पार पाडली आहे, असं फडणवीस म्हणाले. दरम्यान, तिकीट वाटपापासून ते पद देण्यापर्यंतच्या गोष्टींबाबत केवळ फडणवीसांना टार्गेट करणं चुकीचं आहे. कमिटी स्तरावर निर्णय घेण्यात आले असून त्याला केंद्रीय नेतृत्वानेही मंजुरी दिली आहे, असं एका फडणवीस समर्थक नेत्याने सांगितलं.

टीम लीडर होऊ शकले नाही

दरम्यान, फडणवीसांचा पाच वर्षाचा कार्यकाळ यशस्वी ठरल्याचं भाजपमधील एका गटाला वाटतं. फडणवीसांनी गुड गव्हर्नेंसला पुढे नेलं. मात्र, संघटनेचे नेते आणि टीम लीडर म्हणून स्वत:ला सिद्ध करण्यात फडणवीस कमी पडल्याचं सांगितलं जातं. 2013मध्ये त्यांच्याकडे भाजपचं प्रदेशाध्यक्षपद दिलं गेलं होतं. त्यावेळी गडकरी आणि मुंडे गटाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं होतं.

आयारामांवर अधिक भरोसा

फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षातील जुन्या नेत्यांपेक्षा आयारामांना अधिक महत्त्व दिलं. प्रवीण दरेकर मनसेतून आले. त्यांना आमदारकी देतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिलं. प्रसाद लाड आणि गोपीचंद पडळकर यांनाही फडणवीसांनी अधिक संधी दिली. 2019च्या निवडणुकीत बाहेरून आलेल्या नेत्यांनी फडणवीसांची दिशाभूल केली. त्यामुळे निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

बिहारमध्येही जादू चालली नाही

भाजपच्या एका नेत्याने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितेच्या काही ओळी सांगून फडणवीसांचं वर्णन केलं. ‘छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता, टूटे दिल से कोई खड़ा नहीं होता.’ या ओळी या नेत्याने ऐकवल्या. फडणवीसांना गेल्यावर्षी बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी पाठवलं गेलं. मात्र, त्यांची फारशी जादू चालली नाही. बिहारमध्येही भाजपला सत्ता मिळाली नाही, असं या नेत्याचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: कोणत्याही महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण शक्यच नाही, नवाब मलिक यांनी सांगितली व्यवहारिक कारणं

कुर्ल्यात 20 वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, इन्स्टा व्हिडीओ शूटिंगसाठी गेलेल्या तरुणांना आढळला मृतदेह

Omicron Variant: आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भारत पुढे ढकलणार? पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक

Published On - 12:40 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI