आजच्याच दिवशी औरंगजेबानं स्वत:च्या सख्ख्या भावाचं ‘शिर’ आधी तलवारीनं छाटलं नंतर धुवून पाहिलं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 30, 2021 | 7:08 PM

एका प्रसंगानं इतिहास बदलतो याचं हे उदाहरण आहे. दारा शुकोहनं औरंगजेबाविरूद्धची लढाई जिंकलेली होती. त्यावेळेस दारा हा हत्तीवर बसलेला होता. औरंगजेबाकडे फारसे सैनिकही आता लढाईत राहीलेले नव्हते. औरंगजेबाचा पराभव समोर उभा असतानाच खलीलुल्लाह दाराच्या जवळ आला आणि म्हणाला, हजरत सलामत, जीत तुम्हाला मुबारक. तुम्ही आता हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार व्हा. काही सांगता येत नाही, एखादा बाण तुम्हाला लागू शकतो. आणि असं झालं तर आमचं काही खरं नाही. दारानं कसलाच विचार न करता तो हत्तीवरुन खाली आला आणि घोड्यावर स्वार झाला.

आजच्याच दिवशी औरंगजेबानं स्वत:च्या सख्ख्या भावाचं 'शिर' आधी तलवारीनं छाटलं नंतर धुवून पाहिलं
आणि दारा शुकोह हत्तीवरून उतरुन घोड्यावर स्वारा झाला. फोटो.सौ.विकि

Follow us on

आजचाच तो दिवस आहे, (30 August) ज्यादिवशी मुगल बादशाह औरंगजेबानं (Aurangzeb) स्वत:च्या सख्ख्या मोठ्या भावाचा म्हणजेच दारा शुकोहचा(Dara Shikoh) क्रुरपणे खून केला आणि तो निर्विवादपणे शहाजहानच्या साम्राज्याचा बादशाह झाला. दारा हा शहाजहानचा प्रिय होता. शहाजहानचा(Shahjahan) खरा वारस म्हणून त्याच्याकडेच पाहिलं जात होतं. पण शहाजहानच्या चार मुलांमध्ये वारसाच्या लढाया सुरु झाल्या. त्यात औरंगजेबानं एका एका भावंडाचा काटा काढला. पण ज्या क्रुरपणे औरंगजेबानं दारा शुकोहचं डोकं छाटलं आणि त्याच्या मृतदेहाची विटंबना केली तसं उदाहरण क्वचितच इतिहासात पहायला मिळतं. हे सगळं सत्तेसाठी घडलं. मुगल साम्राज्य (Mughal Empire)स्वत:च्या हाती ठेवण्यासाठी घडलं.

शहाजहानचं साम्राज्य मुगल साम्राज्य शहजहानच्याच काळात सर्वोच्च बिंदूला पोहोचल्याचं मानलं जातं. साम्राज्याच्या सीमा उत्तरेत काबूल-कंदहारपर्यंत पसरलेल्या होत्या. खुद्द शहाजहान हा दयाळू पण तेवढाच चतूर म्हणून प्रसिद्ध होता. संपत्ती अफाट होती. शहाजहानच्या राजवैभवानं डोळे दिपून जात. मोठमोठ्या समारंभाच्या वेळी संपत्तीचं प्रदर्शन केलं जाई. हिंदुस्थानचं  वैभव पाहून त्यावेळेस परदेशी प्रवाशांचे डोळे पांढरे होत. मयूर सिंहासन, कोहीनूर हिरा, इतर जडजवाहिर पाहिले की बुखारा, पर्शिया, तुर्कस्तान, अरबस्तानातून आलेले लोक आश्चर्यचकित होत. शहाजहान हा आपल्या आजुबाजूची माणसं खूप काळजीपुर्वक निवडी. त्याचा एवढा मोठा साम्राज्यविस्तार झाला त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यानं स्वत:भोवती निवडलेली कर्तबगार मंडळी. 24 जाने 1657 रोजी शहाजहाननं वयाची 67 वर्षे पूर्ण केली होती आणि त्याला चिंता होती ती त्याच्या वारशाची. साम्राज्य नेमकं कुणाच्या हाती सुरक्षित राहील याची. कारण त्याच्या चारही मुलांमध्ये विस्तवही जात नव्हता. चौघेही जण एकमेकांना पाण्यात पहायची.

शहाजहानची चार मुलं शहाजहानची खास मर्जी होती ती सर्वात मोठा मुलगा दारा शुकोहवर. तशी त्याला चार मुलं होती. दारा, शाहशुजा, औरंगजेब आणि मुराद बख्श. चौघांनीही तारुण्याचा उंबरठा ओलांडला होता. चौघांकडेही कारभाराचा बराच अनुभव होता. दाराला काबूल, मुलतान, शुजाला बंगाल, औरंगजेबाला दख्खन आणि मुराद बख्शला गुजरातची सत्ता सोपवलेली होती. त्यातूनच त्यांच्याकडे दरबारी राजकारण आणि प्रत्यक्ष लढाया यांचा अनुभव पाठिशी होती. चौघांमध्ये बंधूभाव मात्र कुठेच नव्हता. पण वारसाचा प्रश्न होताच. शुजा आणि मुरादबख्श तसे पहिल्यापासून स्पर्धेत नव्हतेच. प्रश्न फक्त दोघांचा होता. दारा शुकोह की औरंगजेब? शहाजहाननं तोही महत्वाच्या प्रसंगी निकालात काढला. दारा शुकोह हाच मुगल साम्राज्याचा वारस असेल हे शहाजहाननं वेळोवेळी सांगितलं. त्यासाठी शहाजहाननं दाराला ट्रेनही केलं. एवढच काय त्याची सुभेदारी दुय्यम अधिकाऱ्याच्या मार्फत चालवायला त्यानं परवानगी दिली. का तर दाराला दिल्लीच्या दरबारात कायम रहाता यावं म्हणून. हे कमी म्हणून की काय, वेळोवेळी दाराला वेगवेगळ्या पदव्या, सन्मान देऊन जवळपास त्याला प्रती बादशाहच शहाजहाननं करुन टाकलं होतं. पण विधीलिखित वेगळं होतं. औरंगजेबाला हे मान्य नव्हतं.

दारा आणि औरंगजेब दारा आणि औरंगजेब यांच्यात पहिल्यापासून कधी जमलं नाही. दोघांचे स्वभाव, जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे वेगवेगळे होते. त्यांच्यातलं वितुष्ट पाहूनच शहाजहाननं ह्या दोन्ही भावंडांना कायम दूर दूर ठेवलं. त्यातही शहाजहाननं दाराला जवळ ठेवलं आणि औरंगजेबाला दूर . दारा हा सर्वेश्वरवादी(Panthestic)होता. तो विद्वान होता. वेद-उपनिषधांचा त्याचा अभ्यास होता. टॅलमुड, नवा करारही त्यानं अभ्यासले होते. तो उदारमतवादी होता पण ह्या सगळ्या अभ्यासाच्या जोरावरच तो घमंडी होता, इतरांना मुर्ख समजायचा असही काही जण मानतात. त्यासाठी ते इतिहासाचे दाखलेही देतात. दाराचा जास्तीत जास्त काळ हा दरबारातच गेल्यानं त्याला रणांगणाचा फार अनुभव नव्हता आणि औरंगजेबाविरूद्धच्या लढाईत निर्णायक क्षणी त्याच गोष्टीचा तोटा झाल्याचं दिसतं.

शहाजहानचं आजारपण शहाजहान आजारी पडला तर दारानं सगळा राज्यकारभार हाती घेतला. तसाही आधी तोच सांभाळत होता. दारानं आपल्या तीनही भावांना शहाजहानला भेटू दिलं नाही. एवढच काय शहाजहानचं आजारपणही त्यानं कळवलं नाही. बंगाल, गुजरात, दक्षिण हिंदुस्थानात जाणारा पत्रव्यवहारही दाराने बंद करुन टाकला. दिल्ली दरबारात काय चाललंय याची भणक तिनही भावंडांना लागू नये म्हणून दारानं हे सगळे उद्योग केले. त्याचा परिणाम उलटा झाला. तीनही भावंडं दाराच्याविरोधात चाल करून आले. त्यांच्या बंदोबस्तासाठी दारानं मग सैन्य पाठवलं. औरंगजेबाविरोधात लढण्यासाठी तो स्वत: गेला.

दारा शुकोहचा पराभव दारा आणि औरंगजेब यांच्यात आता युद्ध अटळ होतं. औरंगजेबाकडे फक्त 40 हजार सैन्य होतं तर दारा शुकोहकडे 4 लाख. पण दाराच्या सैन्यात खोगीरभरती जास्त होती. आणि त्याला स्वत:ला मुलतानच्या एखाद्या लढाईचा अनुभव सोडला तर फार काही माहिती नव्हतं. पण तरीही दारानं जिंकलेली बाजी हरला आणि त्याला जबाबदार त्याचे स्वत:चे सरदार होते. कधी काळी ह्याच सरदाराचा दारानं दरबारात अपमान केला होता आणि त्यान ऐनवेळेस संधी साधली. त्याचं नाव खलीलुल्लाह.

आणि दारा हत्तीवरुन उतरला एका प्रसंगानं इतिहास बदलतो याचं हे उदाहरण आहे. दारा शुकोहनं औरंगजेबाविरूद्धची लढाई जिंकलेली होती. त्यावेळेस दारा हा हत्तीवर बसलेला होता. औरंगजेबाकडे फारसे सैनिकही आता लढाईत राहीलेले नव्हते. औरंगजेबाचा पराभव समोर उभा असतानाच खलीलुल्लाह दाराच्या जवळ आला आणि म्हणाला, हजरत सलामत, जीत तुम्हाला मुबारक. तुम्ही आता हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार व्हा. काही सांगता येत नाही, एखादा बाण तुम्हाला लागू शकतो. आणि असं झालं तर आमचं काही खरं नाही. दारानं कसलाच विचार न करता तो हत्तीवरुन खाली आला आणि घोड्यावर स्वार झाला. त्याचक्षणी दारा मारला गेल्याची अफवा पसरली. दाराचं सैन्य सैरभैर झालं. मग औरंगजेबाच्या त्या मुठभर सैनिकांनी त्यांना पाठलाग करुन संपवलं.

आणि दारा पकडला गेला औरंगजेबाविरुद्धची लढाई हरल्यानंतर दारा शुकोह पळतीवरच होता. त्याला कुठेचा थारा लागला नाही. औरंगजेबापासून वाचण्यासाठी तो कित्येक महिने कुटुंब कबिल्यासह भटकत राहीला. शेवटी त्याला बोलन खिडींजवळ भारतीय सरहद्दीवर असलेल्या दादरच्या अफगाण सरदारानं आश्रय दिला. त्याचं नाव मलिक जीवन. ह्या मलिकला हत्तीच्या पायाखाली देण्याची शिक्षा शहाजहाननं दिली होती. त्याच्यातून दारानेच त्याची सुटका केली होती. त्याची परतफेड म्हणून मलिक जीवननं दाराचं चांगलंच आदरतिथ्य केलं. पण शेवटी तोही बेईमान निघाला. त्यानं दारा, त्याचा धाकटा मुलगा, दोन मुली ह्यांना पकडून औरंगजेबाच्या सरदाराच्या स्वाधीन केलं.

दाराची धिंड दाराला कैद करुन दिल्लीला आणले गेले. यावेळेस दाराची दिल्लीच्या रस्त्यावरुन धिंड काढली गेली. एका लहानशा चिखलानं बरबटलेल्या हत्तीणीवर उघड्या हौदात दाराला बसवलं गेलं. सोबत त्याचा चौदा वर्षाचा मुलगा सिपहरही होता. त्याच्या मागे राक्षसी दिसणारा गुलाम नझर बेग नंदी तलवार घेऊन उभी होता. दाराची अवस्था एखाद्या दरिद्री भिकाऱ्यासारखी होती. अंगावरचे कपडे सगळे मळलेले, चुरघळलेले होते. डोक्यावरची टोपी जुनाट झाली होती. फाटली होती. पायात बेड्या होत्या. हात मात्र मोकळे होते. गळ्यात मोत्याचा एकही मणी नव्हता. शहाजहानच्या एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या वारसाची ही अवस्था औरंगजेबानं केली होती. दाराचा रक्ताचा भाऊ औरंगजेबानं केली होती. बर्नियरनं असं लिहून ठेवलंय- ज्या ज्या ठिकाणी दारानं वैभव पाहिलं होतं, विलासी दिवस अनुभवले होते त्या त्या ठिकाणी त्याची धिंड नेण्यात आली. दिल्लीच्या रस्त्यावर त्याची ही अवस्था बघण्यासाठी गर्दी होती. लोकांना दाराबद्दल सहानुभूती होती. दारानं त्या अवस्थेत एकदाही नजर वर करुन बघितलं नाही.

दाराची हत्या आणि धिंड 30 ऑगस्ट 1659 रोजीच दाराला आणि त्याच्या मुलाला रात्री गुलाम नझीर बेगनं वेगळं केलं. त्यानंतर दाराचे जागच्या जागी तुकडे तुकडे केले. असं सांगतात की, नझीर बेग पुरावा म्हणून दाराचं कापलेलं शिर घेऊन औरंगजेबाकडे गेला. ते सगळं रक्तानं माखलेलं होतं. चेहरा ओळखू येत नव्हता. तर औरंगजेबानं दाराचं ते मुंडकं एका थाळीत ठेवायला लावलं. त्याला धुवून घ्यायला सांगितलं आणि ते दाराचच आहे का याची खात्री केली. ज्यावेळेस औरंगजेबाला ते दाराचंच शीर असल्याची खात्री पटली त्यावेळेस तो धायमोकलून रडला.

दुसऱ्यांदा धिंड पण औरंगजेबा एवढ्यावर थांबला नाही. दाराच्या प्रेताची त्यानं पुन्हा विटंबना करण्याचा आदेश दिला. त्यानुसार दाराचे प्रेत पुन्हा एका हत्तीवर ठेवून दिल्लीच्या त्याच रस्त्यातून दुसऱ्यांदा धिंड काढण्यात आली. आणि शेवटी हुमायूनच्या कबरीशेजारी त्याचे दफन करण्यात आले.

ज्या गुलाम नझीर बेगनं दाराची हत्या केली त्यालाही औरंगजेबानं सोडलं नाही. दाराची हत्या आणि धिंड काढणाऱ्या जीवन खा आणि नझीर बेगला आधी बक्षिसी दिली आणि रवाना केलं. त्यानंतर दोघांचीही रस्त्यात हत्या केली गेली.

(यातले अनेक संदर्भ जदुनाथ सरकार यांच्या औरंगजेब ह्या पुस्तकातून घेतलेले आहेत. सविस्तर माहितीसाठी वाचकांनी मुळ पुस्तक वाचावे)

Bacha Bazi : लोकनियुक्त किंवा तालिबानी, सरकार कुणाचंही असो अफगाणमध्ये बच्चाबाजी जोरात, काय आहे प्रकार?

अफगाणिस्तान: जिथं सिकंदर थकला, औरंगजेबाचा दारुण पराभव झाला, रशिया-अमेरीकेनं पळ काढला

तालिबान्यांच्या मागे दिसणाऱ्या पेंटींगचं मराठ्यांच्या इतिहासाशी थेट कनेक्शन? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI