BLOG : दिदीगिरीची हॅट्रीक… मोदींचा विजयी अश्वमेध रथ रोखणारी वाघीण…

BLOG : दिदीगिरीची हॅट्रीक... मोदींचा विजयी अश्वमेध रथ रोखणारी वाघीण...
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी संपूर्ण ताकद लावूनही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने इतका दणदणीत विजय कसा मिळवला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याच प्रश्नांची उत्तरं शोधणारा टीव्ही 9 मराठीचे सिनियर करस्पॉन्डंट राहुल झोरी यांचा हा लेख.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

May 05, 2021 | 5:22 PM

2014 पासून देशभरात झालेल्या जवळपास सर्वच निवडणुकांमध्ये भाजपनं सरशी करत अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली. केवळ सत्ता मिळवणं हे एकमेव ध्येय ठेवत साम-दाम-दंड-भेद ही सर्व अस्त्रं वापरत भाजपचे ‘चाणक्य’ अमित शाह यांनी अनेक राज्य भाजपच्या छत्राखाली आणली. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आणत ‘अब की बार 200 पार’चा फॅार्म्युला खरा करून दाखवला. मात्र संपूर्ण देशात सत्तेचा लगाम हाती घेत धावत असलेला मोदी-शाह यांचा अश्वमेध अखेर दिदींनी रोखलाय (TV9 Marathi journalist Rahul Zori blog on Victory of TMC Mamata Banerjee and main reasons).

एकीकडे पंतप्रधान मोदी, गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत सर्व केंद्रीय मंत्री, देशभरातले भाजपचे नेते तर दुसरीकडे एकट्याच ममता दिदी अशी लढत झाली. असं असतानाही भाजपच्याच धर्तीवर अब की बार एकहाती 200 पारचा इतिहास रचत ममतांनी मोदींच्या करिष्म्याला केराची टोपली दाखवलीय. सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्रातील एकहाती सत्ता आणि सर्व केंद्रीय यंत्रणांचा सामना करत ममता दिदींनी सलग तिसऱ्यांदा एकहाती बंगालची सत्ता खेचून आणलीय हे विशेष सांगाव लागेल.

देशात मोदी आणि शाह यांना रोखायचं असेल तर कडवं आणि झुंझार नेतृत्व, जनतेचा प्रचंड मोठा जनाधार, प्रशासकीय पकड आणि राजकीय डावपेचांबरोबर दहशत अशा सगळ्या गोष्टी दिदींमध्ये आहेत. हे बंगालच्या या विजयानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मुळात हा कसलातरी करिष्मा किंवा नशिब नाही, तर उत्तम नेतृत्वगूण, जनतेतील लोकप्रियता, प्रादेशिक अस्मितेवर ठाम राहत फक्त मेहनतीच्या जीवावर त्यांनी हे दोनदा घडवून आणलंय. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी येत्या काळात UPA चं नेतृत्व ममता बॅनर्जी यांना निर्विवादपणे द्यायला हवं असंच म्हणावं लागेल.

भाजपसोबतच सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या काँग्रेसला बंगालमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे अजून एका मोठ्या स्टेटमधून काँग्रेससारखा राष्ट्रीय पण संपूर्णपणे हद्दपार झालाय हे ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काँग्रेसनं UPA अध्यक्षपदावरील हट्ट सोडून तिथे बिगर काँग्रेसी नेतृत्वाला संधी देत ममता बॅनर्जी यांचं नेतृत्व स्विकारलं तर येत्या काळात मोदींसमोर एक कडवं आव्हान उभं करता येईल. याशिवाय UPA ला पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभी राहत असेल, तर त्या आघाडीचं नेतृत्व दीदींना सोपवून इतर सर्वांनी संपूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत उभ रहायला हवं. देशात मोदींना टक्कर देणारा दुसरा एकही पर्याय नाही आणि येत्या 5-10 वर्षात तशी कुठली पुसटशीही शक्यता नाही. काँग्रेस आधीच अदखलपात्र झालीय अशाच पद्धतीनं राहिलं तर मग औषधालाही राहणार नाही.

गेल्या आठवड्याभरापासून कोलकत्ता शहरासह आजूबाजूचा ग्रामीण भागात फिरत आहे. शहराचा तर कोपरा ना कोपरा पिंजून काढलाय. या दरम्यान 8 वी फेज 29 तारखेला संपली तेव्हा यातल्या नॅार्थ कोलकातामधील अनेक जागा होत्या. शेवटच्या फेजमधील अटीतटीच्या लढती होत असतानाही शहरात भाजपचा प्रचार मात्र कुठेही दिसत नव्हता. इतकंच काय तर एअरपोर्टला उतरल्यापासून ते आजपावेतो ममता बॅनर्जी आणि टिव्ही 9 बांग्लाचे मोठे बॅनर वगळता संपूर्ण शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचं एकही लहान मोठं होर्डिंग किंवा बॅनर आमच्या नजरेस पडलं नाही.

मागच्या 6 दिवसांत याकडपासून ते त्याकडंपर्यंत आख्ख कोलकाता शहर पालथं घातलं, पण संपूर्ण शहरात मला पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांचा एकही मोठा फ्लेक्स दिसला नाही.

दुसरीकडे शहरातल्या 90 टक्के मोक्याच्या जागांवर फक्त आणि फक्त दिदींच्यांच मोठमोठ्या होर्डिंग्ज जिथे तिथे पहायला मिळत होत्या. याची फक्त दोनच कारण असू शकतात एक तर दिदींवरचं प्रेम, लोकप्रियता किंवा दिदीगिरीची दहशत बस… इथं सांगायचा मुद्दा हाच की दिदींची लोकप्रियता किंवा दहशत इतकी भयानक आहे की भाजपला आपल्या नेत्याच्या होर्डिंग्जसाठी एकही जागा मिळवता आली नाही.

ममता दिदींच्या ऐतिहासिक विजयामागे असणारे काही महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

  • पश्चिम बंगालमधील 74 मुस्लिम बहुल मतदार संघातील मुस्लिम मतांचे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये विभाजन न होता, ती सर्व मुस्लिम मते (stategic voting) ममता बॅनर्जींकडे एकगठ्ठा गेली.
  • बंगालमध्ये आपण एकही जागा जिंकू शकत नाही याचा अंदाज आल्यावर काँग्रेसनं योग्यवेळी माघार घेत केवळ मोदीविरोधी भूमिका कायम ठेवल्याचा मोठा फायदा तृणमूलच्या उमेदवारांना झाला. हे करून काँग्रेसनं कसलेही उपकार दिदींवर केलेले नाही. कारण काँग्रेस या निवडणूकीत फक्त नाममात्र लढत होती.
  • 172 हिंदू बहुल मतदार संघावर भाजपची मदार होती. यामध्ये भाजपकडून कट्टर हिंदुत्व आणि जय श्रीरामचा नारा देण्यात आला होता. मात्र या दोन्ही मुद्यांवर दिदींकडून राबवण्यात आलेल्या सॅाफ्ट हिंदुत्व आणि हमार बांग्ला अस्मितेनं एकतर्फी बाजी मारली. यातच या मतदारसंघात असणारी 15 ते 30 टक्के मुस्लिम मतंही एकगठ्ठा ममता दिदींच्याच पारड्यात पडली.
  • 2016 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसनं 44 जागा या मुस्लिम बहुल मतदारसंघात जिंकल्या होत्या. त्या सर्वच्या सर्व 44 जागा या आज TMC जिंकल्यानं ममता बॅनर्जी यांचा विजय सोपा झाला.
  • भाजपला अपेक्षित असलेल्या मुस्लिम मतांचं कसलंही विभाजन झालं नाही. याऊलट शहरी मध्यमवर्गीय मतदार, शहरी हिंदू व संपूर्ण मुस्लिम मतदार हा ममता बॅनर्जींकडे गेला. याचमुळे भाजपला अपेक्षित विजय मिळवता आला नाही.
  • नंदीग्राममध्ये महिषा, तामूल, साहा आणि तिली या इतर मागास जातींचा मोठा प्रभाव आहे. महिषा ही जात प्रामुख्यानं शेती व मच्छिमारी करणारी असून दक्षिण बंगालमधील ‘प्रभुत्वशाली जात’ असा आवर्जून उल्लेख इथले सामाजिक शास्त्रातील जाणकार करतात. बंगालमधील 40 मतदार संघावर ‘ महिषा ‘ यांच वर्चस्व असून त्यांची मत ही आजवर निर्णायक ठरत आली आहेत.
  • नंदीग्राममधून ममता दिदींचा थोडक्यात पराभव झाला असला तरी ‘महिषा’ समाजानं दिदींना इतर ठिकाणी मोठी साथ दिली असल्याचं दिसतंय. 2019 लोकसभेचा अपवाद वगळता या समाजानं मागच्या दोन्ही निवडणूकांमध्ये दिदीला साथ दिली होती. तिच साथ यंदाच्या निवडणुकीतही कायम ठेवली. याचमुळे ‘महिषा’ प्रभाव असणाऱ्या बहुतांश जागा मोठ्या फरकानं दिदींच्या पारड्यात पडल्या.

पश्चिम बंगालच्या जवळपास सर्वच्या सर्व मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचं आकडेवारीवरून लक्षात येतं. यातच दक्षिण भागातील जवळपास सर्वच मतदारसंघ हे मुस्लिम बहुल म्हणूनच ओळखले जातात. यामध्ये मुर्शिदाबादमध्ये 66 टक्के, मालदा जिल्ह्यात 52 टक्के, उत्तर दिनाजपूरमध्ये 49 टक्के मुस्लिम मतदारांची संख्या आहे. या चारही जिल्ह्यात काही ठिकाणचा अपवाद वगळता सर्व जागा या तृणमूललाच मिळाल्या आहेत.

ममता दिदीची अतिशय साधं राहणीमान हे त्यांना इथल्या लोकांशी जोडून ठेवतं. सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर जाणाऱ्या ममता बॅनर्जी आजही कालीघाट परिसरातील एका खुप साध्या घरातच राहतात.

ममता दिदींनी काँग्रेसमधून बाहेर पडून एक-दोनदा नाही तर सलग तिनदा मुख्यमंत्रीपद, प्रत्येक निवडणुकीत 3 आकडी आमदार आणि 2 आकडी खासदार निवडून आणायचं सातत्य अजून टिकवून ठेवलंय. हे सगळं करत असताना केंद्रातच मोदी सरकारपासून ते सर्व केंद्रीय यंत्रणा विरोधात होत्या. एवढंच नाही तर ज्या पक्षातून ममता बॅनर्जी बाहेर पडल्या त्या काँग्रेस पक्षाला बंगालमधून हद्दपार करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या जोरावर एकहाती जिंकून येण्याचा सक्सेस रेशो पाहिला तर देशात दिदींच्या तुलनेत इतर कुणी खिजगणीतही उरत नाही. म्हणूनच बंगालच्या विजयाचं सर्वच्या सर्व श्रेय हे फक्त एकमेव ममता बॅनर्जी यांचंच आहे यात तिळमात्र शंका नाही.

ममता बॅनर्जी नंदीग्राममधूनच का उभ्या राहिल्या?

नंदीग्राममधून लढायचा हा दिदींचा निर्णय या निकालात खूप महत्वपूर्ण ठरला. सुवेंदुच्या विरोधात लढणं ही सोप्पी गोष्ट नाही. तसंच इथं पराभवही होऊ शकतो हे माहित असतानाही दिदी इथून लढल्या. नंदीग्राममध्ये अधिकारी कुटूंबियांचा प्रभाव माहित असतानाही इथून लढण्याचा निर्णय घेत त्यांनी नंदीग्रामची निवडणूक हायप्रोफाईल केली. नंदीग्राममध्ये झालेली लढत ही फक्त ममता विरूद्ध सुवेंदू नाही, तर ममता विरूद्ध बांग्ला अस्मितेचे ‘गद्दार’ सुवेंदू अशी सिंम्बॅालिक ठरली. याचमुळे नंदीग्राममध्ये जरी ममता यांचा पराभव झाला असला, तरी आजूबाजूच्या सर्व मतदार संघात एकहाती तृणमूलच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय.

‘कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है’ या उक्तीप्रमाणे एका नंदीग्रामच्या बदल्यात अनेक जागा दिदींनी स्वतःच्या पारड्यात पाडून घेतल्या. नंदीग्राममध्येच ममता दिदींच्या पायाला दुखापत झाली हे ही तितकंच महत्वाचं. ज्या ठिकाणी सहज विजय होणार आहे ती सीट सोडून अशा ठिकाणी दिदींचं जाणं हे टीएमसी विरूद्ध गद्दार असं समीकरण निकालात फायद्याचं ठरलं.

“एक ममता म्हणजे 6 शरद पवारांच्या बरोबर”

पुण्यातील काही पत्रकार मित्रांशी बोलताना भाजपच्या एका जेष्ठ नेत्यानं बंगाल निवडणुकीच्या संदर्भात बोलताना ॲाफ रेकॅार्ड सांगितल होतं की, “एक ममता म्हणजे 6 शरद पवारांच्या बरोबर आहे.” याबद्दल मी तेव्हाही सहमत होतोच, पण फक्त यात छोटासा बदल असा की “एक ममता दिदी म्हणजे 6 नाही तर 10 शरद पवार” हे समीकरण बंगालमध्ये फिरताना जास्त रास्त वाटत आहे. त्यामुळं बंगालच्या विजयानंतर सुरू झालेल्या “अदृश्य हात” याबद्दल न बोलणंच योग्य ठरेल. याउलट विचार करत सगळ्यात आधी तिसऱ्या आघाडीचे धडाडीचे पुरस्कर्ते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरील प्रेमास बगल देत ममता दिदींनाच UPA चे अध्यक्ष किंवा तिसऱ्या आघाडीचं अध्यक्ष करण्यासाठी हट्ट धरावा. यामध्ये देशातील सर्वांना एकत्र आणण्यासाठी स्वत: मोठ्या पवारांचीच मदत घ्यावी.

ममता दिदींच्या विजयात टाळ्या वाजवणाऱ्यांसाठी महत्त्वाचं

ममता दिदींच्या या विजयात सर्वांनी टाळ्या वाजवून झाल्या असतील तर आता भाजपला बंगालमध्ये आलेल्या यशाबद्दल मनातल्या मनात का होईना शांतपणे विचार करायची गरज आहे. 2 खासदारांवरून 18 खासदार आणि 3 आमदारांवरून 77 आमदार निवडून आणत व्होटिंग शेअर शेकडो पटीत वाढलाय हे दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाहीये. एकेकाळी डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मिरवणाऱ्या काँग्रेसची संपूर्ण स्पेस ही भाजपनं बळकावली आहे. मुळात भाजपसाठी ही निवडणूक सत्ता खेचून आणण्यासाठी नाही तर 2026 च्या सत्तेची तयारी करण्यासाठी महत्वाची होती. यात ते 100 टक्के यशस्वी झाले आहेत.

दुसरीकडे सुवेंदु अधिकारी यांच्याकडून झालेला पराभव ममतांसाठी जिव्हारी लागणारा आहे. विशेष म्हणजे या लढतीतून भाजपला सुवेंदुंच्या रूपानं ममता दिदींना कडवं आव्हान देणारा विरोधी पक्षनेताही मिळालाय. इतकी वर्ष ममता बॅनर्जी यांच्या सोबतच काम केल्यानं सुवेंदूला टीएमसीमधील सर्व खाच खळगे चांगलेच माहित आहेत. त्यामुळे ताकदीचा विरोधी पक्षनेता म्हणून सुवेंदु अधिकारी ठिकठिकाणी ममता आणि मंत्रिमंडळाला अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाहीत.

(टीप – लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.)

TV9 Marathi journalist Rahul Zori blog on Victory of TMC Mamata Banerjee and main reasons

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें