पावसाळ्यात केळी खाताय, थांबा! कोणते फळे खाणे शरीरासाठी चांगले?
पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते आणि आजारांचा धोका वाढतो. या लेखात पावसाळ्यात कोणती फळे आरोग्यासाठी फायदेशीर आणि कोणती टाळावीत याची माहिती आहे.

- पावसाळा म्हटलं की प्रत्येकजण चमचमीत खाण्याच्या प्रयत्नात असतो. पण पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं फार गरजेचं असतं. कारण पावसाळ्यातील दमट हवेत पचनशक्ती थोडी मंदावते आणि संसर्गाचा धोकाही वाढतो. अशावेळी, काय खावं आणि काय टाळावं, हा प्रश्न अनेकांना पडतो.
- विशेषतः फळांच्या बाबतीत थोडा विचार करावा लागतो, कारण प्रत्येक फळ पौष्टिक असलं तरी, पावसाळ्यात काही फळं तुमच्यासाठी फारच उत्तम ठरतात. तर काही थोडी त्रासदायक ठरू शकतात. चला तर मग या पावसाळी वातावरणात कोणती फळं तुमच्या आरोग्यासाठी गरजेची असतात, याबद्दल जाणून घेऊया.
- पावसाळ्यात फळांची निवड करताना आपल्या शरीराचा प्रकार आणि पचनाची क्षमता लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. अनेकदा केळी आणि सफरचंद या दोन फळांबाबत लोकांमध्ये गोंधळ असतो. दोन्हीही पौष्टिक असली तरी, पावसाळ्यात त्यांचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा असतो.
- केळी लगेच ऊर्जा देतात. पण आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात केळी खाल्ल्याने कफ होऊ शकतो. यामुळे सर्दी, खोकला किंवा पोटाचे त्रास होऊ शकतात. ज्यांना गॅस, बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्या आहेत, त्यांनी पावसाळ्यात केळी खाणं टाळावं. जर खायचीच असतील तर ती फक्त दिवसा खावीत.
- याउलट सफरचंद हलकं, फायबरने परिपूर्ण असतं. यामुळे पचन सुधारते. सफरचंदामुळे शरीर स्वच्छ आणि मजबूत राहण्यास मदत होते. सफरचंदात असलेले फायबर पचनक्रिया निरोगी ठेवतं. ते सालासकट खाल्ल्यास ते अधिक फायदेशीर ठरतं. ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे, त्यांनी सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून सफरचंद खावे.
- यासोबतच लिची ही पावसाळ्याची खरी फ्रेशनेस बूस्टर आहे. लिची शरीराला ताजेपणा देते. तसेच ती लवकर पचते. महत्त्वाचं म्हणजे, यात अँटीव्हायरल गुणधर्म असतात, जे शरीराला विविध संसर्गांपासून वाचवतात.
- पावसाळ्यात डाळिंब तुमच्या आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यामुळे रक्त वाढते आणि शरीराला मजबूत करतं. यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि ते मेटाबॉलिझ्म सुधारण्यासही मदत करतं. त्यासोबतच प्लम हे छोटंसं फळ पावसाळ्यात व्हिटॅमिन सी आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखतं. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.
- पावसाळ्यात पपई खाणंही खूप आरोग्यदायी आहे. पपईमध्ये असलेलं पपैन एन्झाइम पचनक्रियेला निरोगी ठेवतं. जे दमट वातावरणात पचन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे या पावसाळ्यात या फळांची योग्य निवड करून तुम्ही आपल्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊ शकता.








