
महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवार यांच्या दोन वाक्यांनी आज राजकारण ढवळून निघालं. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाला तीन दिवस होत असतानाच शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार यांनी दोन स्टेटमेंट केली.

पहिलं स्टेटमेंट होतं. "दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झालेली. याविषयीचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता" असा खुलासा शरद पवार यांनी केला. दुसरं स्टेटमेंट होतं, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीविषयी आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे शरद पवार यांनी सांगितलं.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची कल्पना नाही असं शरद पवार बोलल्यानंतर दोन तासांच्या आत पार्थ पवार शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. पार्थ पवारांनी शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पार्थ यांनी शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत चर्चा केली. पार्थ पवारांनी शरद पवारांना शपथविधीचं निमंत्रण दिलं.

शरद पवार यांचा 12 तारखेचा दावा खोडून काढताना सुनील तटकरे म्हणाले की, "बारामती येथे कृषी प्रदर्शन झालं. त्यानंतर चहापानासाठी बैठक झाली. त्याचवेळी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असा त्यांनी सांगितलं होतं”

या सर्व घडामोडी घडत होत्या, त्यावेळी जय पवार आणि सुनेत्रा पवार मुंबईत होते. काल रात्रीच ते मुंबईत दाखल झाले. पार्थ पवार बारामतीमध्ये होते. त्यांनी गोविंद बाग येथे जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली.

आज पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत सुनील तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्तावर मांडला. त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. जय पवार ही या बैठकीला उपस्थित होते.