
गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्ससमोवर विजयासाठी 210 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. पण हे आव्हान राजस्थानने सहज गाठलं. यामुळे गुजरात टायटन्सला गुणतालिकेत फटका बसला आहे. गुजरातला प्लेऑफमधील स्थान पक्कं करण्यासाठी अजून विजय महत्त्वाचे आहेत. पण असं असताना कर्णधार शुबमन गिलच्या फिटनेसची चिंता आहे.

शुबमन गिलला फलंदाजी करताना पाठीच्या दुखापतीने हैराण झाला होता. तरीही त्याने 84 धावांची खेळी केली. मात्र राजस्थानच्या डावात क्षेत्ररक्षणाला उतरणं काही जमलं नाही. त्यामुळे राशिद खानने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडली.

गुजरातने या पर्वात 9 सामने खेळले असून 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 3 सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. शुबमन गिलने राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या पराभवानंतर आपल्या दुखापतीबाबत अपडेट दिला आहे. दुसऱ्या डावात मैदानावर न येण्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला त्याने उत्तर दिलं.

शुबमन गिल म्हणाला की, "फलंदाजी करताना मला पाठीत थोडासं दुखत होतं आणि पुढील काही दिवसांत आपल्याला पुढचा सामना खेळायचा आहे. म्हणूनच फिजिओ कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हते." गिलने 50 चेंडूत 84 धावा केल्या. गिलने 168च्या स्ट्राईक रेटने खेळ केला. यावेळी त्याने 5 चौकार आणि 4 उत्तुंग षटकार मारले.

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी गुजरात टायटन्सला उर्वरित पाच सामन्यांपैकी किमान दोन सामने जिंकावे लागतील. गुजरातचे सध्या 12 गुण आहेत आणि दोन सामने जिंकून, संघ 16 गुणांसह अंतिम चारमध्ये प्रवेश करेल. (सर्व फोटो- गुजरात टायटन्स ट्वीटर)