अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात…महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर!

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम केलं जात आहे, असा थेट आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता महायुतीतील संघर्ष समोर आला आहे.

अतुल सावे-सत्तार यांच्यात घमासान, फोनवरच तुफान वाद, सावेंनी रागात...महायुतीतलं भांडण थेट चव्हाट्यावर!
abdul sattar and atul save
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2026 | 5:16 PM

Abdul Sattar Vs Atul Save :  विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत जागावाटपादरम्यान महायुतीला चांगलीच कसरत करावी लागली आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे या जागांच्या वादामुळे महायुतीत संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, आता महायुतीत अनेक नेत्यांनी बंडखोरी केली असून पक्षाचा आदेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छत्रपती संभाजीनगर तर राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. येथे माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांनी पक्षादेश झुगारून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आता महायुतीतील वाद थेट चव्हाट्यावर आला आहे. भाजपाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम केलं जात आहे, असा गंभीर आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे..

…अन् सावे यांनी रागात फोन कट केला

समीर सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर-जालना विधानपरिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी टीव्ही 9 मराठीशी विशेष बातचित केली. यावेळी त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. एका प्रकारे त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक केली आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेवर अन्याय केला जात आहे. शिवसेना पक्षाला संपवण्याचे काम केले जात आहे. भाजपा हे स्लो पॉयझन आहे, असा गंभीर आरोप सत्तार यांनी केला आहे. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मंत्री अतुल सावे यांनीदेखील टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. त्यानंतर मात्र सत्तार आणि सावे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. वाद वाढत असल्याने सावे यांनी रागात आपला फोन कट केला.

सत्तार-सावे यांच्यात काय संवाद झाला?

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणतेही आरोप केलेले नाहीत. अतुल सावे यांना माझं मत समजलेलं नाही, असं वाटतं. मी अतुल सावे यांच्यावर आरोप केलेले आहेत. मी हे आरोप खुलेपणाने केलेले आहेत, असे सत्तार म्हणाले. अतुल सावे यांच्याविषयी मी खुलेपणाने बोलत आहे. त्यांनी कधीही आम्हाला दमडी दिलेली नाही.  18 महिने झाले निवडणुका झाल्या. या अठरा महिन्यात कोणीही आमच्या नगरपरिषद, नगरपालिकेला निधी दिलेला नाही, असा आरोप सत्तार यांनी केला. त्यानंतर सावे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. मी कुठलाही निधी दिलेला नाही, असे सत्तार सांगत आहेत. माझ्याकडे फक्त तांडा वस्तीचा निधी असतो. तो निधी एका वर्षापासून आलेला नाही, असे स्पष्टीकरण सावे यांनी दिले. त्यानंतर सावे यांनी आपला फोन कट केला. दरम्यान, आता हा वाद कुठपर्यंत जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

Follow Us