तब्बल 26 वर्षांनी मायावती-मुलायम एकत्र, भेटल्यानंतर काय म्हणाले?

तब्बल 26 वर्षांनी मायावती-मुलायम एकत्र, भेटल्यानंतर काय म्हणाले?

लखनौ : उत्तर प्रदेशच्या राजकारणात आज (19 एप्रिल) ऐतिहासिक अशी घटना घडली. राजकारणातील एकमेकांचे कट्टर दुश्मन असलेले समाजवादी पक्षाचे (सपा) संस्थापक मुलायम सिंह यादव आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या (बसपा) अध्यक्षा मायावती हे दोघं तब्बल 26 वर्षांनी एकाच मंचावर उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी दोघांनी एकमेकांचे कौतुकही केले. उत्तर प्रदेशच्या मैनपुरी येथे सपा, बसपा आणि आरएलडी यांची संयुक्त महारॅली आयोजित करण्यात आली होती.

मुलायम आणि मायावती 1995 पासून एकमेकांचे कट्टर विरोधी होते. अनेक वर्षांनी दोन दिग्गज नेते एकत्र मंचावर आल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात ऐतिहासिक घटना घडली. सपा-बसपाच्या युतीमुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र अनेक वृत्तसंस्थाच्या पोलमधून दिसले. मात्र आता मुलायम सिंह आणि मायावती हे दोन्ही दिग्गज नेते एकाच मंचावर आल्याने भाजपाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मैनपुरी येेथे मुलायम सिंह यादव यांच्या निवडणूक प्रचारासाठी बसपा अध्यक्षा मायावती उपस्थित होत्या.

जेव्हा दोन नेते एकत्र मंचावर आले तेव्हा दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मुलायम सिंह आपल्या कार्यकर्त्यांसोबत मायवती यांची ओळख करुन देत होते आणि त्यांच्या पाया पडायला सांगत होते. मुलायम म्हणाले, “मी मायावती यांचे स्वागत करतो, मी नेहमीच मायावतींचा सन्मान केला आहे.”

यावेळी मंचावर मुलायम सिंह यांच्या उजव्या बाजूला मायावती बसल्या होत्या, तर डाव्या बाजूला अखिलेश यादव बसले होते. दोन्ही दिग्गज नेत्यांनी भाषणातून एकमेकांचे कौतुक केले.

मायावतींनेही आपल्या भाषणात मुलायम सिंह याचे कौतुक केले. मायावती म्हणाल्या, “मुलायम सिंह खरे मागासवर्गीयांचे नेते आहेत. दरम्यान मायावती यांनी नेरेंद्र मोदींवर टीका करत म्हणाल्या, ते स्वत:ला ओबीसींचे नेते सांगतात. मात्र ते खोटे ओबीसी नेते आहेत. गेस्टाहाऊसचा घोटाळा विसरुन आम्ही दोघं एकत्र आलो आहेत. कधी-कधी कठीण निर्णय घ्यावे लागतात. मुलायम सिंह यांनी मागासवर्गीय लोकांना जोडलं आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे खोटे नेते नाहीत.”

“आज आपल्यामध्ये मायावती आल्या आहेत. मी त्यांचा खूप सन्मान करतो. आज मायवतींचे उपकार आहेत की, त्यांनी आपल्या प्रचारसभेत उपस्थिती दाखवली. मी त्यांचे स्वागत करतो. मायावतींनी मला अनेकदा मदत केली आहे, असं मुलायम सिंह म्हणाले.

समाजवादी पक्षाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अखिलेश सिंह यांनी सांभाळली तेव्हा त्यांनी बसपाला सोबत घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मायावती आणि अखिलेशच्या जोडीला नेहमी बुआ-बबुआ म्हणून ओळखले जाते. गेल्यावर्षी दोन्ही पक्षांनी एकत्र येत कैराना, गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. यानंतर या दोन्ही पक्षांनी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र येत युती केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI