
मोठी बातमी समोर येत आहे, माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहेत. छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली या भेटीदरम्यान अजित पवार यांनी विजय घाडगे यांना शब्द दिला आहे. तसेच सूरज चव्हाण यांना पक्षात घेणार नसल्याचही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाच एक व्हिडीओ समोर आला होता, हा व्हिडीओ समोर येताच राज्यात वातावरण चांगलंच तापलं, विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्यात आली. विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेनं या प्रकरणी त्यांना निवेदन दिलं, तसेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याचवेळी काही कार्यकर्त्यांकडून सुनील तटकरे जिथे बसले होते, तिथे त्यांच्या टेबलवर पत्ते उधळण्यात आले. यानंतर तटकरे यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि छावाचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचं पाहायला मिळालं. यावेळी विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर आता विजय घाडगे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
अजित पवार यांनी विजय घाडगे यांच्यासोबत चर्चा केली, अजित पवार यांच्या भेटीनंतर घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात येत्या मंगळवारपर्यंत आपण निर्णय घेऊ असा शब्द आपल्याला अजित पवार यांनी दिल्याचं यावेळी विजय घाडगे यांनी म्हटलं आहे. तसेच सूरच चव्हाण यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचंही यावेळी अजित पवार यांनी सांगितल्याचंही घाडगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे भाजपच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास बैठक झाली आहे, या बैठकीमध्ये वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
विजय घाडगे यांचा इशारा
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मंगळवारपर्यंत वाट पाहाणार, अन्यथा मंगळवारनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असा इशारा यावेळी घाडगे यांनी दिला आहे.